आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांकडूनच मिळत होतं रेशन माफियांना अभय!

June 14, 2015 6:39 PM0 commentsViews:

शैलेश तवटे, नवी मुंबई

14 जून : रेशन धान्य परवाना कंत्राटदारांच्या यादीत घोटाळेबाज संस्थांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतने उघड केली आहे. ज्या घोटाळेबाज संस्थांवर प्रशासनाने धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते, त्याच संस्थांना अपिल सुनावणीत पुन्हा परवाने बहाल करण्यात आल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विशेषाधिकाराचा गैरवापर केल्याचंही यानिमित्ताने समोर आलंय. आयबीएन लोकमतने यासंबंधीचं सविस्तर वृत्त प्रसारित करताच अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

रेशन धान्य परवाना कंत्राटदारांची यादी माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आली असता हा धक्कादायक खुलासा झाला.

मंत्र्यांकडून अभय मिळालेल्या संस्था खालील प्रमाणे आहेत.

  • अन्नपूर्णा सप्लाय सर्व्हिस, 5 वेळा कारवाई
  • महालक्ष्मी ग्रेन डिलर्स, 4 वेळा कारवाई
  • सिद्धिविनायक ग्रेन डिलर्स, 3 वेळा कारवाई
  • मारीवाला भाटिया कन्झ्युमर्स सोसायटी, 3 वेळा कारवाई
  • सूरज ग्रेन डिलर्स वेल्फेअर असोसिएशन – 3 वेळा कारवाई

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून अपिलात अभय मिळालेल्या घोटाळेबाज संस्थांची संख्या 27च्यावर आहे. आणि विशेष म्हणदजे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या तीनही मोठ्या महानगरांमधली रेशनची सर्व कंत्राट आजही याच 27 संस्थांच्या हाती आहेत. यातली माताभवानी या संस्थेचा परवाना निलंबित होऊनही बिनदिक्कतपणे सुरू आहे. या घोटाळेबाज संस्थांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी तक्रारदारांकडून होतं आहे. या घोटाळेबाज संस्थांवर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी वेळोवेळी कारवाई देखील केली. एवढंच नाहीतर गुन्हेसुद्धा दाखल आहेत. आयबीएन लोकमतने कारवाई झालेल्या एका रेशन संस्थाचालकाशी संवाद साधला असता त्याने मंत्रीच पैशे खात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या वृत्ताची दखल घेत अन्न आणि पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत व्यक्ति कितीही मोठा असो तो दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करणार, असं बापट यांनी आयबीएन लोकमतला सांगितले. हे प्रकरण उघड केल्याबद्दल त्यांनी आयबीएन लोकमतचं अभिनंदनही केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close