मध्यप्रदेशातील पत्रकाराला वर्ध्यात जिवंत जाळलं

June 21, 2015 10:03 PM0 commentsViews:

sandip kothari murder case21 जून : उत्तरप्रदेशमध्ये पत्रकाराला जिवंत जाळण्याची घटना ताजी असताना वर्ध्यात पुन्हा एका पत्रकाराला जिवंत जाळून ठार मारण्याची खळबळजनक घटना घडलीये. संदीप कोठारी असं या पत्रकाराचं नाव आहे. संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेशमधून अपहरण करून वर्ध्यात बुटीबोरी इथं जिवंत जाळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल या दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. तिसरा आरोपी फरार आहे. चिटफंड कंपन्या, भू-माफिया आणि अवैध मायनिंग माफियांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.

19 जून रोजी संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालघाटमधून अपहरण करण्यात आलं होतं. संदीप कोठारी संध्याकाळी आपल्या घरी परतत असताना रात्री 9.30 च्या सुमारास आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांनी त्यांचं अपहरण केलं. संदीप यांना एका कारमध्ये बसवून बालघाटपासून दोन किलोमिटर अंतरावर वर्ध्या जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ आणून मारहाण केली आणि जिवंत पेटवून दिलं.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मृत संदीप कोठारी यांना घटनास्थळीच जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी घटनास्थळापासून जवळच असलेल्या सिंधी स्टेशन पोलिसांना बेवारस मृतदेहाची माहिती मिळाली. पोलिसांनी संदीप कोठारी यांचा मृतदेह अज्ञात समजून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. पण, रात्री उशीर झाल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकलं नाही. अखेर बालघाट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी चिटफंड कंपनीशी संबंधीत असलेल्या विशाल तांडी आणि जमीन व्यवहाराशी संबंधी असलेल्या बुटीबोरी येथील रहिवाशी ब्रजेश डहरवाल या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं. अगोदर दोघांनी उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी संदीप कोठारी यांचं अपहरण आणि हत्येची कबुली दिली.

संदीप कोठारी यांनी चिटफंड आणि अवैध जमीन व्यवहार प्रकरणी आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांच्याविरोधात तक्रार
केली होती. विशाल तांडीच्या विरोधात राजस्थान जिल्ह्यातील उदयपूर येथील हिरणमगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर दुसरा आरोपी ब्रजेश डहरवालच्या विरोधात संदीप यांनी जमीन गैरव्यवहाराची तक्रार दिली होती. त्याचबरोबर मायनिंग माफियांच्याविरोधातही संदीप कोठारी यांनी आवाज उठवला होता. आपल्या विरोधात तक्रार दिला याचा राग धरून आरोपींनी हत्या केल्याचं कबूल केलंय. या प्रकरणी राकेश नर्सवाली हा तिसरा आरोप अजूनही फरार असून पोलीस अधिक तपास करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close