‘त्यांनी’ प्यायलेली ‘ती’ दारूच नव्हती ?

June 23, 2015 10:53 PM0 commentsViews:

hooch23 जून : मालवणी विषारी दारू प्रकरणी बळींची संख्या 104 वर पोहचली आहे. विषारी दारू प्यायलामुळे 104 लोकांचा बळी जाण्याची घटना मुंबईत पहिल्यांदाच घडलीये. पण, ज्या दारूमुळे लोकांचा बळी गेलाय ती दारूच नव्हती. दारूच्या नावाखाली मिथेनॉल आणि पाण्याचं मिश्रण असणारा द्रव पदार्थच लोकांना प्यायला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आता समोर आलीये.

मालवणी दारूकांडानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी धाडीसत्र सुरू केलंय. आजही राज्यभरात गावठी दारूच्या अड्‌ड्यांवर छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मालवणीतला कच्चा माल गुजरातहून आला होता. हा माल योग्य वेळी जप्त केला नसता तर मृतांचा आकडा असता.

आज दहिसरमध्ये हजारो लिटर दारू जप्त करण्यात आली. अटकेत असणारा आरोपी फ्रान्सिस डिमेलो याच्या चौकशीतून यासंबंधी माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा शंभरपेक्षा जास्त झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे ती दारू नव्हतीच तर मिथेनॉल आणि पाण्याचं मिश्रण असणारा द्रव पदार्थच दारू म्हणून विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळालीय. विषारी मिश्रणाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात वापरली गेलेला पदार्थ दारू नव्हतीच अशी प्राथमिक माहिती आहे, असं मुंबई पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. मात्र, यासंदर्भात फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close