उसाच्या प्रश्नावरून दिल्लीत विरोधक आक्रमक

November 19, 2009 10:17 AM0 commentsViews: 8

18 नोव्हेंबरउसाची किंमत ठरवणारी पद्धत बदलण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. याच प्रश्नावरुन लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी दिल्लीत जोरदार निदर्शनं केली. नव्या अध्यादेशामुळे उसाचा भाव ठरवण्यात राज्य सरकारची भूमिका कमी होणार आहे. त्यामुळे उसाला कमी दर मिळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे विधेयक आणू नये अशी मागणी खासदारांनी केली आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो ऊस उत्पादक शेतकरी दिल्लीत दाखल झालेत. याच प्रश्नावरुन अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं. त्यात भाजप, राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पार्टीसह सरकारचा मित्र पक्ष असलेल्या द्रमुकनेही सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज शुक्रवारी11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान संसदेत झालेल्या गदारोळानंतर या प्रश्नावर पंतप्रधानांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, विरप्पा मोईली सहभागी झाले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार उस दराच्या प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे.

close