असंही बाल’कल्याण’, 6-7 कोटींची चिक्की 113 कोटींना खरेदी ?

June 24, 2015 7:37 PM0 commentsViews:

pankjamundechikkiscam224जून : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यामुळे चांगल्याच अडचणीत आल्यात. त्यांच्या खात्याने 45 हजार अंगणवाड्यासाठी विविध 24 वस्तूंची कोणतेही टेंडर न काढताच तब्बल 206 कोटींची खरेदी केलीय. या घोटाळ्यातली सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 6-7 कोटींची चिक्की तब्बल 113 कोटींना खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.

पंकजा मुंडे यांच्या अखत्यारीतील महिला आणि बालकल्याण खात्यात तब्बल 206 कोटींचा घोटाळ्या झाल्याचा आरोप होतोय. राज्यातल्या 45 हजार अंगणवाडीसाठी लागणार्‍या पोषण आहार आणि वस्तू खरेदीत हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. अंगणवाडीसाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या चिक्की आणि इतर शालेय साहित्य कोणतंही टेंडर न काढताच खरेदी करण्यात आलं. विशेष म्हणजे 3 लाखांच्या वरील कोणत्याही खरेदीसाठी ई टेंडरिंग बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांनीच तसा निर्णय घेतलाय. पण, तरीही पंकजा मुंडेंच्या बालकल्याण विभागाने परस्पर एवढी मोठी खरेदी केलीय.

टेंडर न काढताच 206 कोटींची खरेदी
शालेय साहित्य, चित्रकला वह्या
प्रोटीन पावडर, प्लास्टिक सतरंजी
अशा एकूण 24 वस्तूंची खरेदी

या घोटाळ्याला चिक्की घोटाळा म्हणूनही संबोधलं जातंय कारण…याच अंगणावाडी पोषण आहार खरेदी प्रस्तावाअंतर्गंत कोट्यावधींची चिक्कीही खरेदी करण्यात आलीय.

पंकजाचा ‘चिक्की’ घोटाळा
6-7 कोटींची चिक्की 113 कोटींना!
अंगणवाडीतील मुलांसाठी
राजगिरा चिक्की, खोबरा चिक्की
आणि मायक्रो न्यूट्रियंट चिक्कीची 113 कोटींना खरेदी

खुल्या बाजारात या चिक्कीची किंमत अवघी 6 ते 7 कोटी असल्याचं कळतंय. तरीही चिक्की खरेदीचे कंत्राट एकाच संस्थेला बहाल करण्यात आलंय. अवघ्या 2 दिवसांत या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. म्हणूनच या चिक्की खरेदीत नक्कीच काहितरी काळंबेरं असल्याचा आरोप होतोय. या घोटाळ्याची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केलीय.

दरम्यान, भाजपतर्फे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मात्र, पंकजा मुंडेंवरील घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या युती सरकारची वर्षपूर्ती खरंतर अजून बाकी आहे. पण, त्याआधीच युतीच्या मंत्र्यांचे हे असे घोटाळे बाहेर येऊ
लागलेत. म्हणूनच मुख्यमंत्री या घोटाळ्याचा छडा लावणार का हेच पाहायचंय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close