‘चिक्की’ घोटाळा : सर्व खरेदी नियमानुसारच, मुख्यमंत्र्यांकडून पंकजा मुंडेंची पाठराखण

June 25, 2015 10:43 AM0 commentsViews:

CM ON PANKAJA SCAM

25 जून : अंगणवाडी खरेदीमध्ये 206 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेले आरोप राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहेत. अंगणवाडी साहित्य खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे.

महिला आणि बालविकास खात्यात एकाच दिवशी 24 आदेश काढून मर्जीतील लोकांना 206 कोटीची कंत्राटं वाटल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर होत आहे. विशेष म्हणजे ही सगळी कंत्राटं तीन लाखांपेक्षा जास्त किंमतीची असतानाही नियमाप्रमाणे ई-टेंडरिंग करण्यात आलेलं नाही.

पंकजा मुंडे यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी मला फोन केला होता, तसंच या प्रकरणी कोणती चौकशी करायची गरज असेल तर तुम्ही करू शकता असंही सांगितलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही पंकजा मुंडेंचं समर्थन केलं आहे. पंकजाताईंनी त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांचं काम कौतुकास्पद आहे आणि विरोधक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ट्विट विनोद तावडे यांनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close