चारही मंत्र्यांचा राजीनामा घ्या, काँग्रेस-आपची भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शनं

June 25, 2015 4:41 PM0 commentsViews:

bjp protest delhi25 जून : वेगवेगळ्या वादात अडकलेल्या भाजपच्या चार मंत्र्यांविरोधात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आक्रमकपणे रस्त्यावर उतरलीये. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली.

या चारही मंत्र्यांवर इतके आरोप होऊनसुद्धा केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं या मंत्र्यांना पाठिशी घातलंय. त्यामुळे राजधानी दिल्लीत भाजप मुख्यालयासमोर काँग्रेसच्या महिला विभागानं जोरदार निदर्शनं केली.

आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सध्या अडचणीत आल्यात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप त्यांना पाठिशी घालतायत असा आरोप काँग्रेसनं केलाय.

या प्रकरणी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केलीये. तर महाराष्ट्रात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंवर 206 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत काँग्रेसनं त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलीये.

तर बोगस डिग्रीप्रकरणी आरोप झालेल्या केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणींच्या घराबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी अशी मागणीही केलीये. पण, आम्ही आमच्या कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेणार नाही अशी भाजपनं स्पष्ट भूमिका घेतलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close