फियानग्रस्तांच्या डोळ्यात धूळफेक

November 19, 2009 12:57 PM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबरफियानग्रस्तांसाठी कोणतीही ठोस मदत जाहीर न करता केवळ पोकळ आश्वासन मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देण्यात आलं. फियान वादळाचा तडाखा बसलेल्या लोकांना महसूल आणि पुनर्वसन विभागाच्या योजनांमधून मदत देण्यात येईल, असं जाहीर करण्यात आलं. कोणतंही खास पॅकेज जाहीर होणार नसल्याचंही राज्य सरकारने स्पष्ट केलं. कोकणासाठी 125 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा होईल अशी माहिती अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी बैठक झाल्यानंतर दिली होती. तसंच शेतकरी आणि बागायतदारांसाठी वेगळं पॅकेज जाहीर होईल असंही सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्या सरकारच्या भूलथापाच होत्या. मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय जाहीर केले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. 125 कोटी रुपये हे वर्ल्ड बँक केंद्र सरकारला देणार आहे. त्यातला काही निधी राज्याला मिळेल आणि त्यातली काही रक्कम ही कोकणाला देण्यात येईल असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. असं असताना कोकणासाठी 125 कोटी रुपयांच्या पॅकेजची माहिती सुनील तटकरे यांनी का दिली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सगळयात महत्त्वाचं म्हणजे सरकारने गुरुवारी फियानग्रस्तांसाठी कोणतंही पॅकेज जाहीर केलं नाही, जी काही मदत सरकारने जाहीर केली आहे. ते सगळे महसूल आणि पुनर्वसनाअंतर्गत जुन्या निकषा प्रमाणे आहेत. या निकषांनुसार मदत मिळेल एवढंच सरकारने सांगितलं आहे. गुरुवारी राज्यातल्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक झाली. नुकतंच राज्यात फियान चक्रीवादळाचं संकट येऊन गेलं, त्यामुळे मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीकडे राज्यभरातला शेतकरी डोळे लागले होते. कोकणवासियांना एका पॅकेजची अपेक्षा होती. पण या सगळ्या अपेक्षांवर सरकारने अक्षरश: बोळा फिरवला. शेतक-यांचा फक्त अपेक्षाभंगच झाला नाही, तर त्यांची एकप्रकारे फसवणूकच झाली.मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय :जमीनदोस्त घरांना 35000 रुपयांची मदत मिळणार आहे. मच्छिमारांना जाळयांसाठी 10000 रुपये, मोठ्या बोटींसाठी 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत.मृत मच्छिमारांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये मिळतील. जे मच्छिमार बेपत्ता आहेत ते दोन महिन्यांत परतले नाहीत, तर त्यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल.राज्यभरातल्या शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्यामुळे ती माहिती मिळाल्यानंतरच भरपाईचा निर्णय घेतला जाईल. अर्थातच ही सगळी मदत जुन्या निकषांनुसारच दिली जाणार आहे. फळबागा, शेतीच्या नुकसानीचा पंचनामे सुरु आहेत, त्यामुळे पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल असं ही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

close