…तरच लढाऊ महिला पायलटची भरती

November 19, 2009 1:25 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर लढाऊ पायलट म्हणून महिलांना भर्ती व्हायचं असेल, तर त्यांना 14 वर्षं मातृत्वाचं सुख घेता येणार नाही, असं हवाई दलाच्या व्हाईस चीफनी म्हटलंय. एकीकडे सुखोई विमानातून उड्डाण करण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभा पाटील सज्ज झाल्या आहेत. तर दुसरीकडे महिलांवर जाचक अटी लादणारं विधान व्हाईस चीफनी केलं आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील 25 नोव्हेंबरला सुखोई विमानातून उड्डाण करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात बसणार्‍या त्या दुसर्‍या राष्ट्रपती आणि पहिल्याच महिला असतील. सध्या हवाई दलाच्या कुठल्याच महिला पायलटला लढाऊ विमानाचं उड्डाण करण्याची परवानगी नाही. हवाई दल लढाऊ पायलट म्हणून महिलांच्या भरतीसाठी विचार करत असल्याचं हवाई दलाचे व्हाईस चीफ पी. के. बर्बोरा यांनी सांगितलं. पण या भरतीसाठी त्यांना गर्भवती राहता येणार अशी अट घालण्यात आली आहे. एक लढाऊ पायलट तयार करण्यासाठी सरकार 12 कोटी रुपये खर्च करतं. महिला पायलट गर्भवती झाल्यास 10 ते 12 महिने ती काम करू शकणार नाही. म्हणूनच महिलांना लढाऊ पायलट व्हायचं असेल तर त्यांना 14 वर्षापर्यंत मातृत्वाचं सुख घेता येणार नाही, असं बर्बोरांचं म्हणणं आहे. भारतीय हवाई दलात सध्या 784 महिला अधिकारी आहेत. राष्ट्रपतींच्या 25 तारखेच्या सुखोई उड्डाणाकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. भविष्यात आपल्यासाठीही सुखोईचे दरवाजे उघडतील, अशी त्यांना आशा आहे.

close