IBN लोकमतवरच्या हल्याचा सर्वत्र निषेध

November 21, 2009 11:18 AM0 commentsViews: 2

21 नोव्हेंबर IBN लोकमतच्या ऑफिसवर केलेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येतोय. देशभरातल्या पत्रकार संघांनी शिवसेनेच्या या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे. तसंच हल्लेखोरांच्या सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. आयबीएन लोकमतवरच्या हल्ल्याचा सर्वच थरातून निषेध होत आहे. रत्नागिरीतही पत्रकारांनी एकत्र येऊन या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. अतिरीक्त जिल्हाधिका-यांना या हल्ल्यातील आरोपी आणि सूत्रधारांना कठोर शिक्षेच्या मागणीबाबत निवेदन दिलं. पोलीस मुख्यालयातही जाऊन पत्रकारांनी अतिरीक्त पोलिस अधिक्षकांना निवेदन दिलं. यामध्ये इलेक्ट्रिनिक माध्यमांच्या प्रतिनिधिंसह सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधिही हजर होते.सोलापूरमध्येही सीपीएमची निदर्शनं सोलापूरातील सीपीएम पक्षातर्फे IBN लोकमत वरील हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी रिडालोसचे कार्यकर्ते उपस्थित होते. निदर्शन करण्यार्‍या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला. या निदर्शनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरही आडाम यांनी आयबीएन लोकमतच्या पाठींब्यासाठी निदर्शनं केली. यावेळी पोलिसांनी आडाम यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक करुन नंतर सोडून दिलं. नांदेडमध्येही निदर्शन नांदेड प्रेस फोरमच्या वतीनंही आयबीएन लोकमतवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हल्ल्यातील गुंडांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनंही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आलं. त्यात हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

close