ग्रीसवरच्या अर्थसंकटाचा भारतीय शेअर बाजारांवरही परिणाम, 500 अंकांची घसरण

June 29, 2015 1:21 PM0 commentsViews:

financial-collapse29 जून : ग्रीसमधील आर्थिक पेचाचे पडसाद सोमवारी मुंबई शेअर बाजारावर उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 535 अंकांनी आपटला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही याचा परिणाम झाला. निफ्टी 166 अंकांनी पडला. बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही आपटले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळतेय.

दिवाळखोरीला आलेल्या ग्रीसमुळे युरोपियन महासंघावर सध्या आर्थिक संकट घोंगावत आहे. ग्रीस सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून चालला आहे. आधीच ग्रीसने अनेक युरोपिअन देशांकडून कर्ज घेतलं आहे. ते कर्ज त्या देशाला फेडता येत नसल्याने ग्रीसने वाढीव कर्ज आणि मुदत मागितली. पण अर्थव्यवस्थेत सुधारणा करणार नसाल तर वाढीव कर्ज मिळणार नाही, असं या देशांनी स्पष्ट केलं. याचा परिणाम म्हणजे जगातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण पहायला मिळते. ग्रीस आता युरोपिअन महासंघातून बाहेर पडणार अशी चिन्हं आहेत. यात प्रामुख्याने जर्मनीला सर्वाधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. ग्रीसमध्ये सर्व सरकारी बँका सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा सोमवारी करण्यात आली. याचे पडसाद भारतासह आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारांवर दिसून आले.

ग्रीसच्या समस्येचा भारतावर थेट परिणाम होणार नाही, पण युरोच्या संबंधामुळे अप्रत्यक्षरित्या परिणाम होईल, असं भारताचे अर्थसचिव राजीव मेहरिशी यांनी म्हटलं आहे. ग्रीसनं इतर युरोपिअन देशांकडून जे कर्ज घेतलंय, ते फेडण्यास आता ग्रीस असमर्थ आहे. त्यामुळे कर्जदार देशांमधल्या कंपन्या आपली गुंतवणूक भारतासारख्या देशांमध्ये कमी करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेचं ही घसरण झाली आहे.

ग्रीसचा परिणाम इतर आशियाई शेअर बाजारांवरही झालाय. हाँग काँग, टोकिया आणि तैपेईच्या स्टॉक मार्केट्मध्ये घसरण पहायला मिळावी. हाँग काँगचं हँग सेंग यामध्ये 1.7 टक्क्यांची घसरण झालीय तर टोकियोच्या निक्केईमध्ये 2 टक्क्यांची घसरण झालीय. ग्रीसला कर्जदार देशांच्या अटी मान्य नाहीत, ही चांगली बाब नव्हे, आणि यात इतर देश भरडले जातील, असं जपानचे मुख्य अर्थ सचिव यांनी म्हटलं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close