राहुट्या आणि तंबू कुठे उभारायचे ?, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

June 30, 2015 1:11 PM0 commentsViews:

chandrabhaga30 जून : पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या आणि तंबू उभारायला मनाई करणारा आदेश गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने दिली होता. पण यावर्षी वारकरी संप्रदायानं यावर नाराजी व्यक्त केलीय. आणि राहुट्या उभारू द्याव्यात, यासाठी ते पालखी सोहळ्यादरम्यान आंदोलनही करणार आहेत.

चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकर्‍यांच्या राहुट्या आणि तंबू उभारण्यास मज्जाव केलाय. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2014 रोजी न्यायालयाने हे निर्देश दिले होते. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर वारकर्‍यांच्या रूढी परंपरेवर गंडातर आल्याने, वारकर्‍यांनी या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती.

वारकर्‍यांच्या तगाद्यामुळे राज्य शासनाने न्यायालयात धाव घेवून वारी दरम्यान, आठ दिवसांची तात्पुरती सवलत मिळविली होती. आता हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने या आषाढीमध्ये न्यायालयाच्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वाळवंटा ऐवजी प्रशासनाने नदीच्या पैलतीरावर वारकर्‍यांना राहुट्या आणि तंबू मारण्याची व्यवस्था केली आहे.

पण, वारकर्‍यांनी अन्यत्र स्थलांतरित होण्यास नकार दिला असून वारकरी संप्रदायाच्या रूढी परंपरा अबाधित राखण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पालखी सोहळ्या दरम्यान उग्र आंदोलन करू असा इशारा वारकरी फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close