आजाराने ग्रासलेल्या पोलिसाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ !

July 2, 2015 4:40 PM0 commentsViews:

02 जुलै : अहोरात्र धावणार्‍या मुंबईच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असणारे मुंबईचे पोलीस…सण असो, उत्सव असो किंवा सुट्टी असो 24×7 मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. चोवीस तास झटणार्‍या या पोलिसांच्या घरी डोकावून पाहिलं तर मनाला चटका लावून जाणारी परिस्थिती पाहण्यास मिळाली. मुंबई पोलीस दलात 22 वर्ष निष्कलंक सेवा करणारे देवराव ढोरे यांच्या कुटुंबीयांवर हालाकीची परिस्थिती ओढावलीये. अपघातामुळे देवराज ढोरे रुग्णता सेवानिवृत्त झाले पण, त्यांचा पगार या संवेदनशील प्रशासनाने बंद केलाय. घरातला कर्ता पुरूष बिछान्याला खिळून पडल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीये.devraj dhere

मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराव ढोरे….मुंबई पोलीस दलातील 22 वर्षाच्या निष्कलंक सेवेनंतरही आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. 28 मार्च 2012 रोजी कामावरुन परतत असताना काँन्स्टेबल ढोरे एका रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, या एका अपघातानं संपूर्ण ढोरे कुटुंबाचं आयुष्य उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं देवराम ढोरे यांची सध्याची अवस्था मरणापेक्षाही वाईट झालीये. अशा अवस्थेत ढोरेंची दृष्टीही गेली आहे.

त्यामुळं त्यांना कामावर गैरहजर राहण्याचा दाखला देत मुंबई पोलिसांनी त्यांना रुग्णता सेवानिवृत्त केलंय. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्‌या धोरणामुळे ढोरे यांना मिळणारा पगार जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलाय. याबरोबर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटीमधूनच पोलीस दलाचं झालेलं नुकसानही भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय.

आपल्या पतीला मदत मिळावी म्हणून, ढोरे यांच्या पत्नी रेखा गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी दप्तरांचे उंबरठे झिजवताहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मुलांचं शिक्षण, संसार सांभाळायचा आणि नवर्‍याच्या तब्येतीची काळजी घेत, सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवायचे असा रेखा यांचा दिनक्रम बनलाय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहखातं सांभाळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या या सहकार्‍याची दखल घेतील का हे पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close