IBN-लोकमतवरील हल्ल्याचा सूत्रधार सुनील राऊत पोलिसांना शरण

November 24, 2009 4:23 PM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबरआयबीएन लोकमतवरील हल्ल्याचा सूत्रधार आणि भांडुपचा गुंड सुनील राऊत अखेर आज पोलिसांना शरण आलाय. हल्ल्याला तब्बल 4 दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांना सुनील राऊतला पकडण्यात यश आलं नव्हतं. अखेर स्वत: सुनील राऊत कन्नमवार नगरच्या एसीपी ऑफिसमध्ये शरण आला. पण तिथेही त्याला पोलिसांकडून खास ट्रीटमेंट देण्यात आली. सुनील राऊत पोलिसांना शरण आला तेव्हा त्याच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे आमदार तिथे हजर होते. सुनील राऊत हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भाऊ आहे. हा हल्ला झाला तेव्हा सुनील राऊत आयबीएन लोकमतच्या ऑफिसखाली उभा होता अशी माहिती झोन-6 चे डीसीपी राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. यावरुन सुनील राऊतच हल्ल्याचा सूत्रधारच आहे असं नाही तर या हल्लेखोरांचं नेतृत्वही सुनील राऊतनं केलं हे उघड झालंय.अजूनपर्यंत फारसा चर्चेत नसलेला सुनील राऊत हा आयबीएन-लोकमतच्या हल्ल्यानंतर चर्चेत आला. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा भाऊ हीच त्याची ओळख आहे. आयबीएन-लोकमतवरच्या भ्याड हल्ल्यातला तो मुख्य आरोपी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला भांडुप पश्चिममधून शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. संजय राऊत यांच्यामुळेच त्याला विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. पण निवडणुकीत त्याला सपाटून मार खावा लागला. आणि तो तिस-या क्रमांकावर फेकला गेला. भांडुप शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही या निवडणुकीत सेनेला नामुष्की पत्करावी लागली. याचं मुख्य कारण सुनील राऊतसारखा चुकीचा उमेदवार. उमेदवारी मिळण्यापूर्वी तो शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नव्हता. उल्लेख करावा असा त्याचा कुठलाही व्यवसाय नाही.

close