राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सुखोईतून भरारी

November 25, 2009 8:12 AM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबरराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुखोई MKI – 30 या फायटर विमानातून यशस्वी उड्डाण केलं. त्यापूर्वी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर त्यांना एअर फोर्सच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर म्हणजेच मानवंदना देण्यात आली. संपूर्ण जगभरात सुखोईतून उड्डाण करणार्‍या त्या पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. याची नोंद गिनीज बुकमध्येही करण्यात येणार आहे. शिवाय सुखोईतून झेप घेणार्‍या त्या सर्वात वयस्कर राष्ट्रपतीही ठरल्या आहेत. मानवंदनेनंतर उड्डाणापूर्वी पुन्हा एकदा राष्ट्रपतींची मेडिकल फिटनेस टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर उड्डाणासाठीचा खास 'जी सूट' घालून त्या सुखोई उड्डाणासाठी सज्ज झाल्या. पुन्हा एकदा सगळी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, हे तपासल्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुखोईमधून आकाशात झेप घेतली. त्यांनी तब्बल अर्धा तासांची सुखोई सफर करून दोन एस्कॉर्ट सुखोई विमानासह त्यांनी लोहगाव विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं. महिलांना विशेषत: फायटर विमानासाठी पायलट बनवण्यासंबधी सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी सुखोईतून प्रवास करून या चर्चेला निर्णयात्मक वळणाकडे नेल्याचं मानलं जात आहे. महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रपतींनी उचललेलं हे पाऊल असल्याचीही चर्चा आहे.

close