अधिक मासानिमित्त जुन्नरमध्ये सामूहिक धोंडे जेवण

July 5, 2015 8:41 PM0 commentsViews:

रायचंद शिंदे, जुन्नर

05 जुलै : सासर्‍याचा राशितला दहावा ग्रह हा जावई असतो म्हणूनच जावईबुवांना संतुस्ट ठेवण्यासाठी सासरची मंडळी नेहमीच धडपडत असतात. अशाचच धोंड्याचा अधिक मास आला तर मग जावईबुवांच्या सरबराईची ही नामी संधी सासरची मंडळी कशी सोडतील बरं. पुणे जिल्ह्यात तर याच धोंडे जेवणाचा चक्क सामुहिक कार्यक्रम घेतला जातोय. वडगाव रासाई गावात जावई पाहुणचाराचा हा सांग्रसंगीत सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

पुणे जिल्ह्यातल्या वडगाव रासाईतली पै पाहुण्याची साग्रसंगीत मिरवणूक बघून तुम्हाला नक्कीच हा एखादा लग्न सोहळा वाटू शकतो. पण थांबा तो तुमचा गोड गैरसमज होईल कारण हा ताशांचा कडकडाट, या रांगोळ्यांच्या पायघड्या आणि हा पंचपक्वानाचा बेत आखलाय तो फक्त आणि फक्त गावच्या लाडक्या लेकी – जावयांसाठी. निमित्त अर्थातच धोंड्याच्या जेवणाचं, हे इथं वेगळं सांगायला नको. या गावात सामुहकि धोंडे जेवण घालण्याची परंपरा आहे. यंदाही या सोहळ्यासाठी थोडथिडके नव्हेतर तब्बल साडेसातशे जावयांना धोंडे जेवणाचं निमंत्रण धाडण्यात आलं तेही व्हाट्अपवरून.

स्वागत मिरवणुकीनंतर गावच्या सर्व जावयांचा टोपी टॉवेल आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मानही करण्यात आला. तुम्हीच बघा जावई मंडळी कशी रांगेत उभा राहून सासरेबुवांचा मानपान स्विकारताहेत. काय करणार सगळाच सामुहिक मामला तरीही गावाने लेकी जावयांच्या सरबराईत कुठेही कमी पडू दिली नाही. लेकी बाळींनाही भरगच्च बांगड्या भरल्या. आता धोंडे जेवणाचा कार्यक्रम सामुहिक असला म्हणून काय झालं. जावई म्हटल्यावर थोडीतरी थट्टा मस्करी झालीच पाहिजे ना. धोंडे भरवायला मुहेणी आग्रह करणारी असेल जावईबुवा दोन धोंडे जास्तच खाणार पण यातही काही मेहुण्यांनी दाजीबुवांना मिठ मिरचीे धोंडे खाऊ घालून आपला खट्याळपणा दाखवून दिलाच म्हणा. अर्थात तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे म्हणा. तर असा हा साग्रसंगीत सोहळा रात्री पर्यंत सुरू होता… या सोहळ्याच्या निमित्ताने जुन्या मैत्रीणीही खूप दिवसांनी एकत्र आल्याने त्यांच्यात गुजगोष्टीही झाल्या. जावई मंडळींमध्ये गप्पांचे फड रंगले. अशातच काही लेकी आणि जावई हे याच गावातले असल्याने त्यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे डबल धमाकाच होता. तुम्हीच बघा यांचे चेहरे कसे खुललेत ते.

धोंड जेवणाचा सामुहिक सोहळा पार पडल्यानंतर सर्व जावई बुवांना 33 बत्तासे, अनारसे, तांब्याचे ताम्हण आणि पाची पोशाखाचं वाटप करण्यात आले. तर मंडळी असा होतता वडगाव रासाईचा सामुहिक धोंडे जेवण सोहळा. तर मग जावईबुवानो आता तुम्ही कसली वाट बघताय. सुट्टया टाकून निघा आपआपल्या सासुरवाडीला… सासूबाई तुमची वाट बघतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close