26/11तील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी फ्लॅग मार्च

November 26, 2009 9:17 AM0 commentsViews: 6

26 नोव्हेंबर 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी हॉटेल ट्रायडन्टपासून गिरगाव चौपाटी पर्यंत फ्लॅगमार्च काढण्यात आला. गिरगाव चौपाटीवरच शहीद तुकाराम ओंबळेंनी प्राणाचं बलिदान देऊन दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं होतं. यानिमित्तानं ओंबळेंना त्यांच्या सहकार्‍यांनी मानवंदना दिली. गृहमंत्री आर. आर. पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. 26/11 नंतर राज्यात कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज झालेल्या शस्त्रसज्ज पोलीस दलाने गुरुवारी मुंबईत फ्लॅगमार्च केला. हॉटेल ट्रायडन्टपासून सकाळी 8 वाजता हा फ्लॅग मार्च सुरू झाला. त्याआधी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील इतर मंत्री आणि पोलीस अधिकार्‍यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कमांडोनी दहशतवाद्यांचा मुकाबला करणारी आणि नागरिकांना वाचवण्यासाठी करावी लागणारी चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली. फ्लॅगमार्चमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नव्याने तयार केलेलं 'फोर्स वन' हे विशेष पथक, मुंबई पोलीस, एसआरपीएफ सहभागी झाले होते. मंुबई पोलीस दलाचं बँडपथकाने वाजवलेल्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या स्फूर्तीदायक गीताच्या तालावर निघालेल्या या मार्चमध्ये पोलिसांची रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेईकल, कॉम्बॅट व्हेईकल, स्पीडबोटी, पाणी आणि जमिनीवर धावणार्‍या मल्टीपर्पज स्पीडबोट ही शस्त्रसज्ज वाहने सामील झाली होती. डीसीपी मिलिंद भारंबे यांनी या मार्चचं नेतृत्व केलं. मुंबई पोलीस आता कुठल्याही हल्ल्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज आहेत, हा विश्वास यानिमित्तानं मंुबईकरांच्या मनात निर्माण झाला.

close