सागरी सुरक्षेमध्ये अजूनही ढिसाळपणा

November 26, 2009 10:34 AM0 commentsViews: 7

26 नोव्हेंबर 26/11च्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबईसह नवी मुंबईतील सागरी सुरक्षा व्यवस्थेचा ढिसाळपणा समोर आला होता. मुंबईवरील हल्ल्याला एक वर्ष पुर्ण होऊनही सागरी सुरक्षेसंबंधी आजही चोख सुरक्षा व्यवस्था नाही. मुंबईत काही ठीकाणी सागरी गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बोटींची कमतरता असून पोलीस कर्मचार्‍यांना बुलेटप्रुफ आणि लाईफ जॅकेटशिवाय गस्त घालावी लागत आहे. सागरी सुरक्षेतील पळवाटा हेरुन अतिरेक्यांनी मुंबईत प्रवेश केला होता. त्यामुळे सागरी सुरक्षेवर भर देण्याचा दावा सरकारनं केला. नवी मुंबई आणि पनवेल शहराला जवळजवळ शंभर किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र अतिरेकी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं, तरी नवी मुंबईतील सागरी गस्तही ढिसाळ असल्याचं दिसून येतंय. नवी मुंबई सागरी गस्तीच्या जवळचं जेएनपीटी बंदर, भाभा अणू संशोधन केंद्र अशी महत्वपूर्ण ठिकाणं असूनही सागरी गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक स्पीड बोटी इथल्या पोलिसांकडे नाहीत. सागरी गस्त घालण्यासाठी स्थानिक कोळी बांधवांकडून तीन ते चार बोटी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. तीन ठिकाणी 35 ते 40 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गस्त घातली जाते. विशेष म्हणजे गस्त घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांकडे हल्ला झाल्यास सुरक्षेसाठी बुलेटप्रुफ जाकेटसुद्धा नाहीत. लाईफ जॅकेटही उपलब्ध नसल्याने अपघातानंतर पोलीस कर्मचार्‍यांचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जातोय. एवढा मोठा हल्ला होऊनही सरकार सुरक्षेबाबत उदासीन असल्याचंच दिसून येतंय.

close