स्मिता ठाकरे काँग्रेसच्या वाटेवर

November 28, 2009 8:00 AM0 commentsViews: 103

28 नोव्हेंबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी शनिवारी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिली. 'मातोश्री'वर होत असलेली घुसमट आता जास्त काळ सहन करू शकत नाही, असं स्मिता ठाकरेंनी 'टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. स्मिता ठाकरे दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. मोठं पद देऊन काँग्रेसही त्यांचं स्वागत करण्याच्या तयारीत आहे. लवकरच त्या सोनिया आणि राहुल गांधींची भेट घेणार आहेत, असंही 'टाइम्स'नं म्हटलं आहे. "मला राज्यसभेची जागा देण्याचं वचन देण्यात आलं होतं, पण ती जागा भारतकुमार राऊत यांना मिळाली. विधानसभेसाठीही मला तिकिट नाकारण्यात आलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त माझा एकच लेख छापण्यात आला. त्यानंतर माझ्या कुठल्याही लिखाणाला प्रसिद्धी देण्यात आली नाही," अशी खंतही स्मिता ठाकरेंनी व्यक्त केली. तसंच माझ्यासाठी मनसे हा पर्याय असू शकत नाही. राज ठाकरेंच्या राजकारणाशी मी सहमत नाही. मला मराठीचा अभिमान आहे. पण मराठीच्या मुद्यावर हल्ले करणं मला नामंजूर असल्याचं 'टाइम्स'शी बोलताना स्मिता ठाकरेंनी म्हटलं आहे तर 'आईने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत' असं स्मिता ठाकरेंचा मुलगा राहुल ठाकरेंनी सांगितलं आहे. तसंच आम्हाला बाळासाहेबांविषयी पूर्ण आदर असल्याचंही राहुल ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. स्मिता यांना ठाकरे निर्णय घेण्याच स्वातंत्र – उध्दव ठाकरे स्मिता ठाकरे यांना निर्णय घेण्याच स्वातंत्र असल्याचं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केल आहे. मात्र, या विषयावर पत्रकारांशी जास्त बोलण्याच त्यांनी टाळलं.

close