व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबीआयकडे

July 9, 2015 1:08 PM0 commentsViews:

Supreme court of india

09 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून गूढ मृत्यूंच्या मालिकेमुळे देशभरात चर्चेत असलेल्या व्यापम घोटाळ्याचा तपास अखेर सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश आज (गुरुवारी) सुप्रीम कोर्टाने दिले. त्याचबरोबर या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्याचाही तपास सीबीआयने करावा, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे. सीबीआयच्या चौकशीवर सुप्रीम कोर्ट देखरेख ठेवणार का याचा फैसलाही त्यावेळीच होईल.

व्यापम घोटाळ्याशी संबंध असलेल्या व्यक्तींपैकी आत्तापर्यंत 50 जणांचा बळी गेला आहे. तर अजून या घोटाळ्यात किती जणांना आपले प्राण गमवावे लागतील हे सांगणे कठीण आहे.

व्यापम घोटाळ्याचा तपास सीबीआयने करावा, यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोन दिवसांपूर्वी तिथल्या हायकोर्टात अर्ज दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्यासह विविध नेत्यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज गुरुवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली.

दरम्यान, व्यापममध्ये आरोप असणारे मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांची अडचण वाढलीय. राज्यपालांना काढून टाकण्याच्या याचिकेवर कोर्टानं केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहसचिव गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टातला घडामोडींनंतर आता राम नरेश यादव यांना पदावरून हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close