मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव

December 1, 2009 8:53 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांची निवड झाली आहे. श्रद्धा जाधव यांना 114 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या प्रेसिला कदम यांना 95 मतं मिळाली. अटीतटीच्या मानल्या गेलेल्या या निवडणुकीत श्रद्धा जाधव यांनी प्रेसिला कदम यांचा 19 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत एकूण 209 नगरसेवकांनी मतदान केलं, यात 6 नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर 7 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मुंबईच्या महापौरपदी सलग दुसर्‍यांदा महिला विराजमान झाल्या आहेत. गेली 20 वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवणार्‍या शिवसेनेला यंदा धोबीपछाड देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावत श्रद्धा जाधव यांना निवडून आणलं. श्रद्धा जाधव यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला. फटाके फोडत, नाचत गात त्यांनी एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित महापौर श्रद्धा जाधव यांनी महापौरपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आता उपमहापौरपदाची निवडणूक त्यांच्याच अधिपत्याखाली होईल. श्रद्धा जाधव निष्ठावंत शिवसैनिक सुधीर जाधव यांच्या पत्नी आहेत.नारायण राणे यांच्या बंडानंतर राणेसमर्थक कालीदास कोळंबकर यांच्या विरोधात श्रद्धा जाधव यांनी निवडणूक लढवली होती.मूळच्या संगमेश्वर इथल्या असलेल्या जाधव यांनी बी. कॉम.ची पदवी आहेत.1992मध्ये पहिल्यांदा परळमधून निवडून आलेल्या जाधव सलग 3 वेळा परळ मधूनच निवडून आल्यात. त्या सध्या अँटॉप हिलच्या नगरसेविका आहेत.

close