शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार का?

July 14, 2015 9:08 PM0 commentsViews:

farmer
14 जुलै : शेतकर्‍यांना कर्जमाफी शक्य नाही अशी रोखठोख भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून कोंडी केली जात आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सभागृहात गोंधळ घातला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. तर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असून सलग दुसर्‍या दिवशी या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होते.

विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्यावर कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावर चर्चेची तयारी दर्शवली. विदर्भ आणि मराठवाड्यात कर्जमाफीचा फारसा फायदा झाला नसून पश्चिम महाराष्ट्रातही कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने दिल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. शेतकर्‍यांना अन्य काही मार्गाने मदत करता येईल असा पर्यायही त्यांनी सुचवला असून धोरणत्मक निर्णय हे सभागृहातच घेतलं जातात असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आधी कर्जमाफीची घोषणा आणि नंतर चर्चा अशी ठाम भूमिका मांडली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी नाकारणार्‍या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री माफी मागत नाहीत आणि कर्जमाफीची घोषणा करत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close