अमेरिकेच्या निर्बंधातून इराण मुक्त; अणुकरारावर शिक्कामोर्तब

July 15, 2015 10:28 AM0 commentsViews:

AUSTRIA-IRAN-EU-US-CHINA-NUCLEAR-POLITICS15 जुलै : इराण आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधली गेले अनेक महिने सुरू असणारी चर्चा यशस्वी ठरून इराणशी या जागतिक सत्तांनी अणुकरार केला आहे. हा करार मंगळवारी झाला. या करारानुसार इराणच्या अणुकार्यक्रमावर बंधनं येणार आहेत.

तसंच इराणला अणुबॉम्ब तयार करता येणार नाही. अणुइंधनाचा वापर लष्करी कारणासाठी करण्यावरही इराणवर बंधनं येणार आहेत. पण, हा करार झाल्याने इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध शिथिल होणार आहेत. इराणला तेल आता आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येणार आहे. हा करार झाल्याने इराण आणि अमेरिकेतलं अनेक दशकं असलेलं शत्रुत्वाचं वातावरण निवळण्याची शक्यता आहे.

ओबामांनी केलं स्वागत

इराणशी झालेल्या करारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणशी झालेल्या अणुकराराचं स्वागत केलं आहे. या करारामुळे पश्चिम आशियात होणारा अणवस्त्रांचा प्रसार रोखला जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. इराणशी अमेरिकेचे असलेले मतभेद शांततापूर्ण मार्गाने सोडवले जावेत हे मत असणार्‍या ओबामांनी हा करार होण्याविषयी पुढाकार घेतला होता. इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांनीही हा करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या करारामुळे इराणच्या जागतिक संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

इंधनाचे भाव गडगडले

इराणशी झालेल्या अणुकरारामुळे इराणच्या तेलव्यापारावरचे निर्बंध दूर होणार आहेत. त्यामुळे इराणकडून तेलाची निर्यात सुरू होऊन जागतिक बाजाराच आधीच कमी असलेले तेलाचे भाव आणखी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याची चुणूक कालच पहायला मिळाली. इराणशी करार झाल्याची बातमी पसरताच तेलाचे भाव 2टक्क्यांनी गडगडले. तेलाचे भाव त्यानंतर पुन्हा वाढले पण काही काळ तेलदरात अस्थिरता राहील असा अंदाज व्यक्त होतोय. इराण अणुकराराने पश्चिम आशिया तसंच युरोपातली राजकीय समीकरणंही बदलणार आहेत.

इराणमध्ये जल्लोष

या अणुकराराची बातमी समजताच इराणची राजधानी तेहरानमध्ये इराणी नागरिकांना जल्लोष सूरू केला. मंगळवारी रात्री अनेक इराणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त केला. इराणच्या अर्थव्यवस्थेवर याआधी लादले गेलेले कठोर निर्बंध या करारामुळे शिथिल होणार आहेत.यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close