आम्हाला आत्महत्या करू द्या !, शेतकर्‍यांची प्रशासनाकडे मागणी

July 15, 2015 11:40 AM0 commentsViews:

wardha farmar15 जुलै : पावसाळी अधिवेशनात इकडे कृषी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असतानाच तिकडे विदर्भात सात शेतकर्‍यांनी थेट आत्महत्येचीच परवानगी प्रशासनाकडे मागितलीय. वर्धा जिल्ह्यातले हे सर्व शेतकरी आहेत. 2014-15 साली वादळी पावसामुळे झालेली पीकाची नुकसान भरपाई दप्तर दिरंगाईमुळे अजूनही लाभाथीर्ंच्या खात्यात जमा झालेली नाही. म्हणून वडदमधल्या पीडित शेतकर्‍यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय.

जिल्ह्यात जानेवारी 2014-15 मध्ये पिकांना वादळी पावसाचा तडाखा बसला. शेतकर्‍यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून शासनाने अनुदानही जाहीर केले. अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाला मिळाली आणि तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ही रक्कम लाभार्थ्यांना न पोहचता ती इतरांच्या खात्यात जमा झाली आहे. तर काही शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. वडद येथील शेतकर्‍यांनी पाठपुरावा केला पण प्रशासन एकूण घ्यायला तयार नाही, अनुदानापोटी मिळणारी रक्कम जरी 10 हजाराच्या घरात असली तरी प्रशासनाला शेतकर्‍यांच्या या पैशाचे मोल कधी कळणार असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. अनुदान रोखून अशा प्रकारची अडवणूक करणे योग्य आहे काय असाही सवाल निर्माण होत आहे. अखेर या शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाला आत्महत्येची परवानगी मागितली आहे .

एकूण चार टप्प्यात सर्व्हे करून तहसील कार्यालयाला यादी पाठविण्यात आली. यात काहींची नावे होती तर काहीची नावे नव्हती. एप्रिल आणि मे महिन्याच्या यादीमध्ये राहिलेल्या सर्वांची यादी पाठविण्यात आली. आधीच्या यादीप्रमाणे चार शेतकर्‍यांचे खात्यात पैसेही जमा झालेत . परंतु खाते क्रमांक बदलल्याचे प्रशासनही मान्य करते आहे .

शेतकर्‍यांनी आत्महत्येला मागितलेली परवानगी योग्य जरी नसली तरीही प्रशासन शेतकर्‍यांना टोकाची भूनिका घ्यायला भाग पडते आहे असा सूर उमटत आहे. एकूणच प्रशासन या प्रकरणाला किती गांभीर्याने घेते ते पाहावे लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close