विरोधकांची आघाडी, सरकारची कोंडी !

July 15, 2015 11:53 AM0 commentsViews:

congress ncp in ses15 जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस उजाडला. तिसर्‍या दिवशीही विरोधकांनी आघाडी घेतलीये. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकाचं आंदोलन सुरूच आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेईपर्यंत कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीनं घेतली आहे. त्यामुळे सरकार कोंडीत सापडले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी अभिनव आंदोलनं करून फडणवीस सरकारच्या नाकीनऊ आणले आहे. पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा, विनोद तावडेंची बोगस डिग्री प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

आज तिसर्‍या दिवशी सकाळपासून विधानभवन पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आधीच विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय.

तर विधानपरिषदेत प्रचंड गदारोळामुळे गेले दोन दिवस कामकाज होऊ शकलेलं नाही. हा तिढा आज तरी सुटतो का हे पाहावं लागणार आहे. विरोधकांकडून आज या मागणीसाठी स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, तर सत्तारूढ पक्षाकडून यावरती चर्चा लावण्यात आलीय. कुणाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल हे आता पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close