‘याकूबला फाशी देण्यासाठी इतकी घाई कशाला ?’

July 15, 2015 1:08 PM0 commentsViews:

majid memon 345315 जुलै : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख दोषी याकूब मेमनला फाशी देण्यात येणार आहे. मात्र, आता त्याच्या फाशीवरुन वाद उफाळून आलाय. येत्या 30 जुलैला याकूबला फाशी देण्यात येणार असल्याचं समजतं. पण, कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अशा पद्धतीने घाई-घाईने फाशीची तयारी का केली जातेय, असा सवाल कायदेतज्ज्ञ माजीद मेमन यांनी विचारला आहे.

टाडा कोर्टाने याकूब मेमनला 2007 सालीच फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात याकूबने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण, सर्वांनी त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर राष्ट्रपतींनीकडेही त्याने दाद मागितली होती. पण, राष्ट्रपतींकडून वेळेत निर्णय आला नाही. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे आता याकूबला फाशी होणार हे निश्चित झालंय. पण, याकूबला फाशी देण्याची इतकी घाई कशाला ?, जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत फाशीची कारवाई करणे चुकीचे आहे. त्यामुळे वेगळा संदेश यातून दिला जातो असा युक्तीवाद कायदेतज्ज्ञ माजीद मेमन यांनी केला. याकूबला शिक्षा देण्यात इतका रस कशाला ?, त्याला शिक्षा द्यायची म्हणून निर्णय घेण्यात आला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच कारवाई होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण 30 जुलैला याकूबला फाशी देण्यात यावी, असा कुठलाही आदेश सरकारने काढलेला नाही, असं गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या सेंट्रल जेलमध्ये 30 जुलैला सकाळी 7 वाजता याकूबला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close