शिवसेना : विजयानंतरही आव्हान कायम

December 2, 2009 2:31 PM0 commentsViews: 3

2 डिसेंबर शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर आपला गड राखला असला तरी सेनेसमोर नाराजीचं आव्हान कायम आहे. बाळासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न असलेले गजानन किर्तीकर. शिवसेना राज्यभर रुजवण्यात ज्यांचा हातभार लागला, त्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतले एक नेते. हेच किर्तीकर सध्या सेनेवर नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे उघड केली आहे. पण त्यांना थंड प्रतिसाद मिळत असल्याचं स्वत: कि र्तीकर सांगतात. त्यामुळेच ते मनसेत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. पण जुन्या जाणत्यांबरोबर तरुण कार्यकर्तेही नाराज असल्याची चर्चा आहे. स्मिता ठाकरे यांच्या पाठोपाठ महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेविका स्नेहल जाधव सध्या नाराज आहे. त्या आणि त्यांचे पती सुधीर जाधव निष्ठावंत शिवसैनिक समजले जातात. पण तरीही त्या मनसेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी सकाळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटही घेतली. ते लवकरच बाळासाहेबांना भेटून शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. एकूणच सेनेत सध्या संघटनात्मक पातळीवर काहीही आलबेल नसल्याचं या दोन उदाहरणांवरुन दिसतंय.दोघांशीही चर्चा करु – मनोहर जोशी स्नेहल जाधव या महापौरपदासाठी लायक उमेदवार होत्या. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करु, तसंच गजानन कीर्तीकर यांच्याशीही चर्चा करू, असं शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

close