शेतकर्‍यांना संपवण्याची भाषा करू नये, सेनेचं भाजपवर टीकास्त्र

July 16, 2015 9:50 AM0 commentsViews:

Uddhav and fadnavis1116 जुलै : शेतकरी-कष्टकर्‍यांच्या घामातून हे राज्य निर्माण झाले आणि त्याच शेतकर्‍यांनी तुम्हाला सत्तेवर आणले आहे. त्यांनी तडफडूनच मरायचे होते तर मग आधीचे सरकार काय वाईट होते ?, जनतेने सरकार नेमले आहे आणि सरकार हे जनतेचे नोकर आहे. त्यामुळे नोकराने मालकांना उद्‌ध्वस्त करण्याची भाषा करू नये अशी टीका शिवसेनेनं आपल्या मुखपत्र ‘सामना’तून फडणवीस सरकारवर केलीये.

शिवसेना विरुद्ध भाजपचा ‘सामना’ अजूनही सुरूच आहे. फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहाराचा समाचार घेतल्यानंतर आज(गुरुवारी) शिवसेनेनं ‘सामना’तून ‘कालचे लुटारू,आजचे साव!’ अग्रलेखातून शेतकर्‍यांची बाजू घेत फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच विरोधकांवरही आसूड ओढलाय. “शेतकरी-कष्टकर्‍यांच्या घामातून हे राज्य निर्माण झाले आणि त्याच शेतकर्‍यांनी तुम्हाला सत्तेवर आणले आहे. त्यांनी तडफडूनच मरायचे होते तर मग आधीची राजवट काय वाईट होती? नव्या राज्यात बदल होतील आणि जगणे सुखाचे होईल या अपेक्षेने त्यांनी नव्या सरकारची योजना केली. जनतेने सरकार नेमले आहे आणि सरकार हे जनतेचे नोकर आहे. त्यामुळे नोकराने मालकांना उद्‌ध्वस्त करण्याची भाषा करू नये असा डोसच फडणवीस सरकारला पाजण्यात आला.

‘कालचे लुटारू होते ते आज साव’

“प्रजेचे कल्याण हेच राजसत्तेचे खरे ध्येय असायला हवे. कालच्या सत्ताधार्‍यांनी जनतेच्या तोंडात माती घातली म्हणून त्याच मार्गाने आपणही जावे असा नियम नाही. कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विधिमंडळात चाललेल्या गोंधळास उत्तरे देता येतील, पण शेतकर्‍यांचा जो आक्रोश सुरू आहे आणि त्यांच्या आयुष्याची जी पडझड होत आहे, त्याला आधार देणारी कोणती ठोस योजना सरकारकडे आहे? महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे. गाढव ओझ्याने वाकला आहे म्हणून गाढवाच्या जागी शेतकर्‍यांची नेमणूक करून त्यांना मारले जाऊ नये. सध्याचे विरोधक जे कालचे लुटारू होते ते आज साव बनले आहेत, ते ढोंगी आणि आपमतलबी आहेत हे बरोबर आहे, पण कालपर्यंत आपणही विरोधातच होतो याचे भान ठेवून आजच्या विरोधकांशी व्यवहार व्हायला हवा असा सल्लाही देण्यात आलाय.

तसंच, सामान्य शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अस्मानी-सुलतानीच्या कचाट्यात अडकला आहे. कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे त्याला शक्य झालेले नाही. या दुष्टचक्रातून त्याला शेवटी सरकारनेच बाहेर काढायचे आहे. कारण प्रश्न शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाचा आहे. विरोधकांशी कधीही भांडण करता येईल असंही भाजपला सुनावण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close