गोंदिया जि.प.अध्यक्षावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट?

July 16, 2015 3:53 PM0 commentsViews:

GONDIA

16 जुलै : विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारविरोधात एकत्र आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपच्या युतीवर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपच्या पाठिंब्यावर स्वतःचा अध्यक्ष केल्याने राष्ट्रवादीने हा आक्षेप नोंदवला आहे.

याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस भाजपाचा पाठिंबा काढणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. पण असा व्हिप बजावला गेला असला तरीही गोंदियामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला मदत केल्याचं उघड होत आहे. त्यामुळे गोंदियामध्ये काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांवर कारवाईचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्याचबरोबर गोंदियामध्ये काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनीच स्थानिक पातळीवर हा निर्णय परस्पर घेतला असून यात आपली कोणतीही भूमिका नाही, असं काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं असून अग्रवाल यांच्यावरही कारवाईचे संकेत देण्यात आलेत.

एकीकडे विधिमंडळात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसंदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्यागही केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार मात्र कामकाजात सहभागी झाले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज 1 तासासाठी तहकूब करण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close