काँग्रेस-भाजप एकत्र आले यामध्ये काय (काळा)कांडी ? -शिवसेना

July 17, 2015 12:06 PM0 commentsViews:

uddhav-on-fadnavis17 जुलै : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला सामना काही थांबायचं नाव नाही. आज पुन्हा एकदा शिवसेनेनं ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल केलाय. गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजप एकत्र आले यामध्ये काय (काळा)कांडी आहे? असा सवाल ‘सामना’मधून विचारण्यात आलाय. तसंच ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात झगडे करायचे आणि त्यांनाच बोहोल्यावर घेऊन सत्तेसाठी मिठ्या मारायच्या ही लोकांशी प्रतरणा आहे अशा उपरोधिकपणाने भाजपला खडेबोल ‘सामना’च्या अग्रलेखातून सुनावण्यात आले आहे.

एकीकडे पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपची चांगलीच कसोटी लागलीये. विरोधकांनी भ्रष्टाचार प्रकरणं, कर्जमाफी प्रश्नी सरकारच्या नाकीनऊ आणले आहे. पण, भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही विरोधकांच्या बाजूने ‘आवाज’ वाढवत आहे. आज पुन्हा शिवसेनेनं आपल्या मुखपत्र ‘सामना’मधून भाजपचा समाचार घेतलाय. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला आहे. विधानसभेत काँग्रेसने भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनागोंदीचे आरोप केले. त्यामुळे काँग्रेसने भ्रष्टाचारास मिठी मारली की भाजपने कालच्या भ्रष्टाचार्‍यांना पवित्र करून सोयरिक जमवली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपला काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी वाटला नाही आणि काँग्रेसलाही भाजप जातीयवादी असल्याचा विसर पडला. अशा धाडसी लोकांचे राज्य महाराष्ट्रावर आसल्याने शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे सर्वच प्रश्न धूमधडाक्यात मार्गी लागतील, याविषयी आमच्या मनात शंका नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात झगडे करायचे आणि त्यांनाच बोहोल्यावर घेऊन सत्तेसाठी मिठ्या मारायच्या ही लोकांशी प्रतरणा आहे अशा शब्दात भाजपला खडेबोल सुनावण्यात आले आहे.

तसंच गोंदियात काँग्रेस-भाजप एकत्र आले यामध्ये काय (काळा)कांडी आहे? या एकत्रीकरणास स्थानिक राजकारण कारणीभूत आहे, पण अशी मजबुरी ती कोणती? उद्या अशीच मजबुरी आहे असे सांगून आपण पाकड्यांचे पाय गंगाजलाने धुऊन ते तीर्थ प्राशन करायचे काय? ज्यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लढायचे, वस्त्रहरण करायचे त्याच वस्त्रहरणातील चिंधी उपरणे म्हणून खांद्यावर टाकून मिरवायचे. यामुळे तात्पुरते सुख मिळाले असले तरी या सुखाचे काटे भविष्यात टोचतील. आता दबाव वाढल्यामुळे कदाचित गोंदियातील काँग्रेससोबतचे हे साटेलोटे गुंडाळूनही ठेवले जाईल, पण ‘बूंद से गयी वो हौदसे नहीं आती’ हेदेखील लक्षात घ्यायला हवे असा सल्लावजा टोलाही लगावण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close