तब्बल 13 तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पूर्वपदावर

July 20, 2015 9:43 AM0 commentsViews:

mumbai pune way 43

20 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येतेय. रात्री बाराच्या सुमारास दरड काढण्याचं काम पूर्ण झालं. तीन लेन पैकी, दोन लेन सुरळीत झालीय. तर एक लेन बोगद्याजवळ अजुनही बंद आहे. तब्बल 13 तासांनी पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येतेय.

खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन ठार आणि तीन जखमी झाले. लोणावळा अपघातात मृत्यू पावलेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांना राज्यसरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय. भाईंदर येथे राहणारे दिलीपभाई गोपाळभाई पटेल आणि डोंबिवलीचे शशिकांत धामणकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर निर्मला पटेल, सुशीलाबाई धामणकर आणि मंगल माने जखमी झाल्या आहेत. रविवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मोठी दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झाली होती. जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही याचा परिणाम जाणवला, आणि तो रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रविवारचा दिवस असल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या गाड्यांची मोठी गर्दी असते. या प्रवाशांच्या गर्दीला रविवारी प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. संध्याकाळच्या सुमारास एक लेन सुरू करण्यात आली असली तरी वाहतूक कोंडीचा ताण एवढा मोठा होता की त्या लेनमधून गाड्या पुढे सरकायलाही बराच वेळ लागत होता. आता दरड हटवण्याचं काम पूर्ण झालेलं असल्यामुळे सध्या दोन्ही बाजूंची आणि दोन्ही रस्त्यांवरची वाहतूक पूर्ववत झालेली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close