ललित मोदी प्रकरणी विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ

July 21, 2015 11:34 AM0 commentsViews:

lalit gaterajyasabha

21 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. तर लोकसभेत दिवंगत लोकसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरूवात झाली. ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या मुद्यावरून शर्मा आज चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं. ललित मोदी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ललित प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी शर्मा यांनी सभापतींकडे केली. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला. या गदारोळातच सभापती हमीद अंसारी यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केले.

लोकसभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याचे सभापती सुमित्रा महाजान यांनी जाहीर केले.

दरम्यान, भूसंपादन विधेयक आणि जीएसटी विधेयक ही दोन महत्त्वाची विधेयकं मंजूर व्हावीत किंवा त्यामध्ये थोडीफार तरी प्रगती व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असून विरोधकांनी मात्र या विधेयकांला कडाडून विरोध केला आहे. आज काहीवेळापूर्वीचं पंतप्रधानांनी अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह,आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांचीही भेट घेतल. त्याआधी काल दिवसभर दिल्लीमध्ये यासंबंधीच्याच घडामोडी वेगानं घडत होत्या. सर्वपक्षीय बैठकीत संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं विरोधकांनी मान्य केलं. तर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक काल झाली. सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close