अखेर वरुणराजे परतले, राज्यभर बरसले

July 21, 2015 10:18 PM0 commentsViews:

mumbai_rain_21_july (22)21 जुलै : उशिरा आलेल्या पावसाच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा आलेल्या पावसाचं स्वागत करावं असं म्हणतात. जून महिन्याच्या मध्यावर गायब झालेला पाऊस अखेर जुलै संपतासंपता आलाय. पावसाची वाट बघणार्‍या आपल्या सगळ्यांना हा मोठा दिलासा आहे. पण पावसामुळे लगेचच सगळीकडे दाणादाणही उडालीय. मुंबई आणि उत्तर कोकणात चांगला पाऊस आहे. पाऊस तर आलाय पण पावसामुळे दाणादाण उडालीय.

 

मुंबईत पावसाचा वाहतुकीवर परिणाम

मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे मध्य आणि हार्बर सेवा विस्कळीत झालीये. मध्ये रेल्वे मार्गावार रेल्वे गाड्या अर्धा तास उशिरानं धावतायत. मध्य रेल्वेवर कुर्ला ते माटुंगा रेल्वे स्टेशनांदरम्यान पाणी साचलंय. हार्बरवर लाइनवरही  कुर्ला ते चुना भट्टी दरम्यान पाणी साचलं. पश्चिम मार्गावरही लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. विरार ते डहाणू लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. विरार फास्ट गाड्या अर्ध्या तास उशीरा जात असल्यानं विरार वसईकरांचे हाल होताहेत. पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. माहीम-माटुंगा स्टेशन दरम्यान पाणी साचलं. विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

  तलाव फुल

दरम्यान, सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने एकीकडे मुंबईकरांचे हाल झाले असले तरी दुसरीकडे मात्र याच पावसामुळे अख्या मुंबईला 10 दिवस पाणी पुरवठा केला जाऊ शकेल इतका पाणी साठा मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये वाढलाय. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांवरच्या पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता निर्माण झालीय.

औरंगाबाद -जालन्यात पावसाची हजेरी

मुंबई आणि कोकणानंतर आता मराठवाड्यात अखेर पावसाला सुरुवात झालीये. औरंगाबादमध्ये गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडतोय. गेल्या महिन्याभरापासून पावसानं मराठवाड्यात दडी मारली होती. त्यामुळं खरीप पीक धोक्यात आलं होतं. इतकंच नाही तर मराठवाड्यातील पाण्याचे साठेही संपत चालले होते. पण आता बळीराजाला दिलासा मिळालाय.

मावळ नद्या-नाले तुडुंब

राज्यातील बहुतांशी भागात वरुणराजाने दमदार पुनरागमन केलं असून पावसाचं माहेरघर असणार्‍या मावळ तालुक्यात मागील 24 तासांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे, यामुळे तालुक्यातील बहुतांशी नद्या-नाले दुथडी भरुन वाहतायत. मागील चोवीस तासांपासुन कोसळणार्‍या संततधार पावसामुळे इंद्रायणी, पवना, कुंडलीका या महत्वाच्या नद्यांसह ओढे ,नाले पात्राबाहेर वाहु लागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेलीय त्याचबरोबर प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. साहजिकच वाहन चालक आणि पर्यटकांना कसरत करावी लागत आहे. येत्या काही तासात पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने पुढील 24तास नदीकाठावर राहणार्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भिवंडी जलमय

भिवंडीत तीन बत्ती बाजार पेठेमध्ये 100 पेक्षा जास्त दुकानांमध्ये पाणी घुसलंय. निजामपूर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. पद्मानगर, म्हाडा कॉलनी, इदगाह रोड आणि शेलार नदी नाका परिसरातही घरांमध्ये पाणी शिरलं.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close