‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, म्हणणारे मोदी आता गप्प का?- राहुल गांधी

July 23, 2015 2:21 PM0 commentsViews:

rahul gandhiaw

23 जुलै : संसदेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी सरकारविरोधात आंदोलन मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली होती. पण, काँग्रेसचा आक्रमक पवित्रा आजही कायम असल्याचं दिसत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवारी) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, अशा घोषणा करणारे पंतप्रधान व्यापम आणि ललितगेटवर गप्प का आहेत?, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. त्याचबरोबर जो पर्यंत आरोप झालेले नेते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत संसदेत चर्चा होऊ देणार नाही, या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना पासपोर्ट मिळवून देण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणावरून संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून गदारोळ होत आहे. काँग्रेसकडून स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आज (गुरुवारी) काँग्रेसच्या खासदारांनी दंडावर काळ्या फिती बांधून संसदेत प्रवेश केला होता. गोंधळामुळे संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं.

व्यापमं सारख्या एवढ्या मोठ्या गैरव्यवहारानंतर चाळीसहून अधिक नागरिकांचा मृत्यू होतो. त्यावर पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत. ते या विषयावर गप्प का आहेत. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. लोकांमध्ये पंतप्रधानांबद्दलचा विश्वास हळूहळू कमी होत आहे. मोदी जेवढे कमी बोलतील, तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, पण नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत अशी खोचक टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पंतप्रधान हवेत वक्तव्ये करतायेत, त्यांच्या शब्दांमध्ये शक्ती असल्याचं म्हटलं जातं. सुषमा स्वराज यांनी तर गुन्हा केला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय सभागृहात चर्चा होऊ देणार नसल्याचं ही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close