FTII च्या विद्यार्थ्यांविरोधात धमकीचा गुन्हा दाखल

July 23, 2015 7:58 PM0 commentsViews:

ftii student343423 जुलै : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन एकीकडे सुरू आहे. मात्र, दुसरीकडे एफटीआयआयमधील कर्मचारी संजय चांदेकर यांना धमकावल्या प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी हा गुन्हा नोंदवला गेलाय.आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर बेकायदेशीर कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संजय चांदेकर हे FTII मधे कम्युनिटी रेडिओचे काम करतात. मागील आठवड्यात गुरुवारी चांदेकर, एफटीआयमधील आणखी एक कर्मचारी विश्वास नेर्लेकर आणि दोन माजी कर्मचारी सदाशिव फडके आणि पुराणिक अशा चौघांनी पत्रकार परिषद घेउन आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर टीका केली होती. आंदोलन करणारे विद्यार्थी संस्थेत गैरप्रकार करतात. त्यामुळे गजेंद्र चौहान आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकारी मंडळाला काम करू दिलं जावं असं या चौघांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्याचबरोबर गजेंद्र चौहान यांना या पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला होता.

त्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांनी चांदेकर यांच्याकडे विचारणा केली की तुम्ही पत्रकार परिषदेत केलेले आरोप कोणत्या आधारे केले. त्यानंतर चांदेकर सोमवारीच FTII मध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विद्यार्थांनी मला धमकावलं असं पत्रकारांना सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते संस्थेतुन निघून गेले. या सगळ्या दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. मात्र त्या दिवशी चांदेकर यांनी तक्रार नोंदवली नाही. परंतु मंगळवारी त्यांनी पोलीस सहआयुक्तांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.

परंतु दिवसभर काहीही झाले नाही. मात्र बुधवारी रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आणि तो डेक्कन पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. बेकायदेशीर कृत्य करणे तसंच धमकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे आहेत.

या प्रकरणी तपास करुन कारवाई करण्यात येईल असं अशी माहिती पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद यांनी दिली. या तक्रारी मध्ये विद्यार्थी एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचं रामानंद यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close