…नाहीतर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ, राजेंचा आव्हाडांना इशारा

July 25, 2015 2:52 PM0 commentsViews:

raje on awhad25 जुलै : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी भिडे यांच्या वादात सातार्‍याचे खासदार उदयन राजे भोसले यांनी उडी घेतलीये. भिडे गुुरूजींवर पुन्हा असे आरोप झाल्यास संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, मग होणार्‍या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे असा इशारा देत उदयनराजे भोसलेंनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न चांगलेच बजावले आहे.

सांगलीमध्ये शिवसन्मान जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत मिरजची दंगल भिडे गुरूजींनी घडवल्याचा जाहीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. त्यामुळे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शिवसन्मानच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी झाली होती.
सांगली, सातारा परिसरातही या वादाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच वादात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांनीही उडी घेतलीय.

संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्य हे मोठे आहे. त्यांच्यावर कुठल्याही व्यासपीठावरून अशा भाषेत आरोप करणे आम्ही कदापिही सहन करणार नाही. यापुढे असे घडल्यास त्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. मग होणार्‍या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे असा इशाराच राजेंनी आव्हाडांना दिलाय.

सांगलीत संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या संघटनेवरही उदयनराजे यांनी नाव न घेता टीका केली आहे. अशा संस्थांनी आपल्या उद्दिष्टांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यक्रम जरूर करावेत, पण अशा कार्यक्रमांमधून कुठलीही व्यक्ती, जात, धर्म किंवा समाजावर ही अशी खालच्या पातळीवरील टीका अतिशय चुकीची आहे. यामुळे सामाजिक एकोप्याला बाधा येत आहे. हे असे प्रकार यापुढेही सुरू राहिल्यास त्याला आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करू, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close