‘त्या’ वादग्रस्त ट्विट्सवरून सलमानचा यू-टर्न

July 26, 2015 8:02 PM0 commentsViews:

26 जुलै : 1993 बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनला फाशी देऊ नका, त्याच्या भावाला टायगरला फाशी द्या, असं ट्विट केल्याने बॉलीवूडचा दबंग पुन्हा एकदा वादात सापडलाय. रविवारी पहाटे सलमाननं एकापाठोपाठ एक ट्विट्स करत याकूबचा बचाव केलाय. चहू बाजूंनी टीकेची झोड उठल्यावर आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या सल्लूभाईने 15 तासांतच यूटर्न घेतला. अखेर त्यानं ट्विटरवरूनच बिनशर्त माफी मागितली आणि आधीचे ट्विट्स मागे घेतले.

टायगर मेमनला आणा आणि त्याला फाशी द्या. टायगरऐवजी टायगरच्या भावाला फाशी दिली जातेय. अरे, टायगर कुठे आहे? एका निरपराध्याला मारणं म्हणजे मानवतेला मारणं आहे. मला हे तीन दिवसांपासून ट्विट करायचं होतं पण मी घाबरत होतो. पण हा एका व्यक्तीचा आणि त्याच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. भावाला फाशी देऊ नका. जो कोल्हा पळून गेला, त्याला फाशी द्या, असं सलमान खाननं ट्विट केलं आहे.

Salman-Khan

हे ट्वीट्स करताच सलमानवर टीकेची राळ उठली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर थेट सलमान खानचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. तसं पत्रही त्यांनी राज्यपालांना पाठवलं. तर सातार्‍यात शिवसैनिकांनी सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा बंद पाडला. मुंबईत सलमानच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली.

दरम्यान, सलमानच्या वडिलांनीच त्याला जाहीररीत्या फटकारलं. सलमाननं जे लिहिलंय ते हास्यास्पद आणि अर्थहीन आहे. मुद्दा काय आहे ते सलमानला माहित नाही. लोकांनी ते गांभीर्यानं घेऊ नये, सलीम खान यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमन निर्दोष आहे, असं मी म्हटलं नव्हतं किंवा मला तसं म्हणायचंही नव्हतं. मला आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या ट्विटमुळे गैरसमज होऊ शकतो असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं आणि मला ट्विट्स मागे घ्यायला सांगितले. मी माझे ट्विट्स मागे घेत आहे. माझ्या ट्विट्समुळे नकळतपणे काही गैरसमज निर्माण झाले असले, तर मी माफी मागतो. माझे ट्विट्स धर्माच्या विरोधात आहेत, असं म्हणणार्‍यांचा मी तीव्र निषेध करतो, असं म्हणत सलामानने या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close