कलाम यांचे अखेरचे सहा तास आणि ‘तो’ “Funny Guy” !

July 28, 2015 3:44 PM0 commentsViews:

srujan pal singh28 जुलै : माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं सोमवारी शिलाँग इथं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या या शेवटच्या क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांचे सहकारी सृजन पाल सिंह यांना लाभलं. काल सृजन पाल सिंह हे डॉ. कलाम यांच्यासोबत होते. आज त्यांनी कलाम यांच्यासोबत घालवलेल्या अखेरच्या क्षणाचा उलगडा फेसबुकवर केलाय.

सृजन सिंह म्हणतात, 27 जुलैला दुपारी 12 वाजता आम्ही गुवाहटीसाठी दिल्लीहून रवाना झालो होतो. डॉ. कलाम यांनी डार्क काळ्या रंगाचा सूट घातलेला होता. खराब हवामानामुळे अडीच तासांचा प्रवास करून आम्ही गुवाहटीत पोहचलो. तिथून कारने आम्हाला आयआयएम शिलाँगला पोहचण्यासाठी आणखी अडीच तास लागला. या पाच तासांच्या प्रवासात कलाम यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पंजाबमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर कलाम यांनी दु:ख व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी प्रवासामध्ये संसदेत सुरू असलेल्या
घडामोडींवर चर्चा केली आणि हे थांबलं पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. तसंच त्यांनी कॉलेजमध्ये ज्या विषयावर लेक्चर देणार होते त्याबद्दल चर्चा केली आणि संसदेत सुरू असलेल्या घटनांवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार असंही सांगितलं होतं.

आम्ही सगळेजण 6 ते 7 कारने शिलाँगला चाललो होतो आणि डॉ.कलाम हे दुसर्‍या कारमध्ये होते. आमच्या कारच्या समोर एक ओपन जिप्सी होती. त्यात एक सुरक्षारक्षक उभा होता. एका तासाच्या प्रवासानंतर कलाम यांनी तो सुरक्षारक्षक उभा का आहे ?, तो थकला असेल, त्याला बसण्यासाठी सांगा. पण, मी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव तो उभा असले असं त्यांना सांगितलं. पण, कलाम सरांनी प्रवासात तीन वेळा त्या सुरक्षारक्षकाला बसण्यासाठी सुचवलं. ज्यावेळी आम्ही शिलाँगला पोहचलो त्यावेळी कलाम सरांनी स्वत: जाऊन त्या सुरक्षारक्षकाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले. त्या सुरक्षारक्षकाला ‘जेवण केलं की नाही’ अशी विचारणाही केली. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असं सांगत त्यांनी खेदही व्यक्त केला.

kalam meet soldjrत्यानंतर आम्ही लेक्चर रुममध्ये पोहचलो. ते नेहमी सांगायचे आपल्यामुळे विद्यार्थ्यांवर वाट पाहण्याची वेळ येऊ नये. मी लगेच त्यांच्यासाठी माईक चेक केला, ज्या लेक्चरवर आम्ही बोलणार आहोत त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि कॉम्प्युटर सांभाळलं. त्यांनी माझ्याकडे पाहुन “Funny guy” असं म्हटलं. हे त्यांचे शेवटचे शब्द होते. 2 मिनिटांच्या भाषणानंतर ते शांत झाले आणि काही समजण्याच्या अगोदर ते खाली कोसळले.

आम्ही  व्यासपीठावर धाव घेतली. डॉक्टरही तिथे तातडीने दाखल झाले होते. आम्हाला त्यावेळी जे शक्य होतं ते सगळं आम्ही केलं. ज्यावेळी डॉक्टर त्यांची तपासणी करत होते त्यावेळी त्यांचे डोळे उघडे होते ते मी कधीही विसरू शकत नाही. कलाम सरांचं डोकं मी एका हाताने धरलं होतं. आणि त्यांनी माझा हात पकडलेला होता. अखेरच्या क्षणी सुद्धा त्यांच्या चेहर्‍यावर वेदनेच्या खुणा नव्हत्या. पाच मिनिटांत आम्ही नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पोहचलो. आणि काही मिनिटांनी डॉक्टरांनी ‘मिसाईल मॅन’ आपल्यात नाही अशी दुख:द वार्ता दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close