अब्दुल कलामांचं पार्थिव रामेश्वरमला रवाना, उद्या होणार अंत्यसंस्कार

July 29, 2015 9:20 AM0 commentsViews:

kalam_Rameswaram29 जुलै : माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर त्यांच्या जन्मगावी रामेश्वरम इथं 30 जुलै रोजी लष्करी इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिल्लीहून कलाम यांचं पार्थिव विशेष विमानानं मदुराईला नेण्यात येतंय. हे विमान दुपारी 12 वाजता मदूराईमध्ये पोहोचेल. त्यानंतर मदूराईहून हेलिकॉप्टरने पार्थिव रामेश्वरममध्ये नेलं जाईल. रामेश्वरममध्ये संध्याकाळी सात वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि गुरूवारी सकाळी कलाम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. कलाम यांचं सोमवारी शिलाँग इथं निधन झाल्यानंतर गुवाहाटीहून मंगळवारी त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आलं. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पालम विमानतळावर तिरंग्यात गुंडाळलेले कलाम यांचं पार्थिव लष्करी अधिकार्‍यांनी विमानातून बाहेर आणलं. त्यानंतर सेनादलाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पालम विमानतळावर जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

त्यानंतर डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्लीतल्या 10, राजाजी मार्गावर असलेल्या शासकीय निवासस्थानी नेण्यात आलं. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिन्ही दलांचे प्रमुख, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आदींनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मान्यवरांसह कलाम यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांनीही मोठी गर्दी केली होती. यात शाळकरी मुलं, महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत.

आज कलाम यांचं पार्थिव मदुराईला नेण्यात आलंय. मदूराईला पोहचल्यानंतर हेलिकॉप्टरने पार्थिव रामेश्वरममध्ये नेलं जाईल. कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. कलाम यांचे ज्येष्ठ बंधू मुथू मोहम्मद मीरान मरक्कईर यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close