अखेर याकूबला फासावर लटकवलं

July 30, 2015 8:18 AM0 commentsViews:

BRKING940_201507291404_940x35530 जुलै : 257 निष्पाप लोकांचा बळी घेणार्‍या 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला अखेर फासावर लटकावण्यात आलं.याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात सकाळी 6.35 वाजता याकूबला फाशी देण्यात आली. 7.05 मिनिटांनी डॉक्टरांनी याकूबला मृत्यू घोषित केलं. याकूबचा मृतदेह नागपूर जेलमध्ये दफन करणार की मुंबईला नेण्यात येणार यावर संभ्रम निर्माण झालाय. याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही.

अभूतपूर्व गदारोळानंतर याकूब मेमन आज फासावर लटकला. गेल्या 22 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा महत्वाचा भाग आज संपला. 2007 साली विशेष टाडा कोर्टाने याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी यासाठी याकूबने सुप्रीम कोर्ट ते राष्ट्रपती भवनाचे उंबरठे झिझवले. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी याकूबची धावाधाव सुरू होती. पण, अखेरीस याकूब भोवती फास आवळला गेला आणि आज सकाळी याकूब फासावर लटकला.

ठरल्याप्रमाणे नागपूर मध्यवर्ती कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली. आज सकाळी पहाटे 2 वाजता फाशीची प्रक्रिया सुरू झाली. फाशीपूर्वी याकूबला नवे कपडे घालायला दिले. त्यानंतर त्याला धार्मिक पुस्तकं वाचायला दिली आणि त्याने नमाज अदाही केली. त्यानंतर सकाळी 6.35 याकूबला फासावर लटकवण्यात आलं. अजमल कसाबला ज्या जल्लादने फाशी दिली त्याच जल्लादने याकूबला फाशी दिली. फाशीनंतर जेलच्या डिस्पेंसरीत मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. याकूबचा मृतदेह जेल परिसरातच दफन करण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली. जेल परिसरात कैदी जिथे शेती करतात, तिथे याकूबला दफन करण्यात येणार असं कळतंय. पण, दुसरीकडे याकूबचा मृतदेह मुंबईत आणला जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कायदेशीर बाबीत अडचणी येऊ नये म्हणून याकूबच्या फाशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं.

याकूबच्या फाशीची माहिती मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देणार आहे. तसंच 11 वाजता मुख्यमंत्री विधानसभेत याबाबत निवेदन करतील. तब्बल 22 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 257 लोकांचा बळी घेणार्‍या देशद्रोहीला अखेर आज फासावर लटकावण्यात आलंय.

याकूबच्या फाशीची प्रक्रिया कशी झाली ?

- रात्रीच याकूबला फाशीबाबत कल्पना दिली होती
– पहाटे 3 वाजता फाशीची प्रक्रिया सुरू
– फाशीपूर्वी याकूबला नवे कपडे घालायला दिले
– फाशीपूर्वी याकूब मेमननं नमाज अदा केली
– याकूबला धार्मिक पुस्तक वाचायला दिलं
– सकाळी 6.35 वा. याकूबला फाशी दिली
– फाशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं
– फाशीवेळी मॅजिस्ट्रेट आणि वैद्यकीय पथक हजर होतं
– याकूबच्या नातेवाईकांपैकी कुणीही हजर नव्हतं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close