चौकशी पूर्ण होईपर्यंत पंकजांनी राजीनामा द्यावा, धनंजय मुंडेंची मागणी

July 30, 2015 6:59 PM0 commentsViews:

DHANJAY MUNDE IN VIDHAN PARISHAD

30 जुलै :  महिला- बालकल्याण विभागाच्या चिक्की घोटाळ्यावरून विधानपरिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी चिक्कीच्या कंत्राट वाटपात दरकरार निश्चित केला नसल्याचा आरोप केला. या घोटाळ्याला पंकजा मुंडे यांना जबाबदार धरत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

चिक्की, औषधं, बिस्किटे, वॉटर प्युरिफायर, चटया, ताटे यांच्या खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. अंगणवाड्यांकडून चिक्की, बिस्किटे, चटया यांची कोणतीही मागणी आलेली नसताना या वस्तू खरेदी करण्याची कंत्राटे का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना या घोटाळ्याबाबतची माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे सरकारने लोकांचा विश्‍वास गमावला, अशी टीका त्यांनी केली.

कागदपत्रे आणि जुन्या निर्णयांचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी एकेक मुद्दा मांडत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, चिक्की खरेदीसाठी केंद्र सरकारकडून पैसे आले होते. ते खर्च केले नसते, तर परत गेले असते, हा राज्य सरकारकडून करण्यात आलेला बचाव फसवा आहे. हे पैसे डिसेंबरमध्ये आले होते. मात्र, ते मे मध्ये खर्च करण्यात आले.

आयुर्वेदिक बिस्किटे खरेदी करण्याचा मूळचा प्रस्ताव 95 लाखांचा होता. मात्र, तो रद्द करून 5 कोटींची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर ही बिस्किटे खरेदी करण्यासाठी ज्या ‘गोवर्धन आयुर्फामा’ला कंत्राट देण्यात आले त्यांच्याकडे ही बिस्किटे बनवण्याचा परवानाच नाही, याकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले.

चिक्कीबरोबरच बिस्किटे आणि वॉटर फिल्टरसाठी दरकरारातही मोठा घोटाळा झाला. वॉटर प्युरिफायर खरेदीची ऑर्डर दरकराराआधीच देण्यात आली. आयुक्तांनी 4500 रुपये किमतीचा वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला असताना, प्रत्यक्षात 5200 रुपये किमतीचा वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. किंमत वाढवून का खरेदी करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close