चिक्कीच्या निमित्ताने विधान परिषदेत भाऊबंदकी

July 30, 2015 8:18 PM0 commentsViews:

30 जुलै : विधान परिषदेत आज पुन्हा एकदा मुंडे विरूद्ध मुंडे असा सामना बघायला मिळाला, निमित्त अर्थातच चिक्की घोटाळ्याचं होतं.विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतून धनंजय मुंडेंनी आपली बहिण पंकजावरच भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. पंकजानेही मंत्री या नात्यानेच भावाच्या आरोपांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं.

विधानपरिषदेत पंकजा मुंडेंच्या महिला बालकल्याण खात्याचा चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेला आला. विशेष म्हणजे हा घोटाळ्याचा विषय पंकजाचा भाऊ धनंजय मुंडे यांनीच चर्चेला आणला. या घोटाळ्याच्या निमित्ताने आपल्याच बहिणीवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाऊ धनंजय अजिबात कचरला नाही. उलट या वादाला भाऊबंदकीचा रंग दिला जाऊ नये यासाठी धनंजयने हे आरोप आपण राज्याचा एक जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून करत असल्याचं सांगायचं स्पष्ट केलं.

धनंजयच्या आरोपांचं उत्तर द्यायला पंकजा उभी राहताच विरोधकांनी तिला बोलू देण्यास नकार दिला. त्यावेळी पंकजाचा चेहरा रडवेला झाला होता. सरतेशेवटी मग स्वत: मुख्यमंत्री पंकजाच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी पंकजाला मंत्री या नात्याने तरी त्यांच्यावरच्या आरोपांचं उत्तर देऊ दिलं पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा कुठे पंकजाला आपल्यावरच्या आरोपांचं खंडण करण्याची संधी मिळाली. पंकजाने भाऊ धनंजयला तशासतसे प्रत्युत्तर दिलं.

pankaja and dhandjay1

महिला आणि बाल कल्याण हे खाते मला त्यांच्या पोषणासाठी दिले गेलंय त्यांच्या शोषणासाठी नाही असं रोखठोक उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेली राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळली. या प्रकरणात माझी एक रुपयाची चूक असेल आणि माझे नेते मला सांगतील त्याच दिवशी राजीनामा देईन असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले.

चिक्की खरेदीत मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. जे काही आहे ते नियमानुसारच केले असल्याचं पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं. आयुर्वेदिक बिस्किटाचे कंत्राट घेतलेल्या गोवर्धन आयूर फार्माकडे परवाना नसल्याचा आक्षेप विरोधकांनी केला असता, पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना सांगितलं की आयुर्वेदिक बिस्किटाचे कंत्राट घेतलेल्या गोवर्धन आयूर फार्माकडे एफडीएऐवजी एफएएसएसओचा परवाना आहे. तसंच ताटाचं ऑर्डर घेतलेल्या वैद्य इंडस्ट्रीज ही कंपनी रविवारी बंद असते, काही जणांनी नेमक्या याच दिवशी येऊन चित्रीकरण केलं असा दावा वैद्य इंडस्ट्रीजने केला असल्याचे पंकजा मुंडे यांना सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close