सेना-मनसेची ‘फ्रेंडशिप’, भय्यू महाराजांची मध्यस्थी ?

August 1, 2015 7:27 PM0 commentsViews:

raj uddhav bhaiyyu maharajउदय जाधव,मुंबई

01 ऑगस्ट : पावसाळी अधिवेशन संपत असतानाच राज्यात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालीये. आणि विशेष म्हणजे राज्यातल्या या नव्या युतीसाठी चर्चा मात्र राज्याबाहेर होतेय. या चर्चेमुळे सत्ताधारी भाजपला हादरे बसतील आणि विरोधकांचेही धाबे दणाणू शकतात. त्याचं कारण म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भय्यू महाराज यांची भेट..या भेटीमुळे राजकीय चर्चेना उधाण आलं.. सेना-मनसे युतीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिलीये. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट…

राज ठाकरे क्वचितच महाराष्ट्राबाहेर…इतर राज्यांत जातात. आणि जेव्हा जातात तेव्हा कारणं राजकीयच असतात. ऑगस्ट 2011मध्ये राज गुजरातमध्ये गेले होते. तेव्हा त्यांची आणि मोदींची वाढती जवळीक ही बातमी होती. आता राज ठाकरे गेले आहेत मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये. एकेकाळी होळकरांचं राज्य असलेल्या इंदूरमध्ये आताही एका मराठी माणसाचंच प्रस्थ आहेत. त्यांचं नाव आहे भय्यू महाराज. उद्धव ठाकरेंशी जवळीक असलेल्या भय्यूंना राज ठाकरे भेटल्यामुळे नवी राजकीय समीकरणं आकाराला येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. पण त्याबद्दल काहीही बोलणं राज ठाकरेंनी टाळलं..

येत्या ऑक्टोबर महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांची युती होण्यासंदर्भात राज आणि भय्यूंमध्ये चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिलीये. यानंतर भय्यू उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने ताराराणी आघाडी सोबत युती जाहीर केलीय. त्यामुळे कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अशा वेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला धडा शिकवण्यासाठी आपण एकत्र यावं, अशी सेना-मनसेच्या स्थानिक नेत्यांचीही मागणी आहे. भय्यू महाराज राज आणि उद्धव दोघांना जवळचे असल्यामुळे मध्यस्थाची भूमिका निभावू शकतात.

मूळ विदर्भातले असलेले भय्यू महाराज राज्यातल्या आणि देशातल्या सर्वपक्षीय नेत्यांना जवळचे वाटतात. दिल्लीत अण्णांचं उपोषण
सोडवण्यासाठी विलासराव देशमुखांनी भय्यूंना पाचारण केलं होतं. मोदींच्या सद्भावना यात्रेचा शेवटही भय्यूंच्या हातून झाला होता. आता त्यांच्या आशीर्वादाने ठाकरेंच्या दोन्ही सेना एकत्र येतात का, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close