राज पुरोहित पुन्हा गोत्यात, निवडणूक आयोगाला दिली खोटी माहीती

August 3, 2015 11:28 AM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई
03 ऑगस्ट : भाजपचे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेत. कारण आमदार राज पुरोहित यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे, दोन वेगवेगळे मतदार ओळखपत्र असल्याचं, माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे. तसंच राज पुरोहित यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात पत्नी राधीका पुरोहित यांचा बोगस पॅनकार्ड नंबर दोनवेळा दिल्याचंंही समोर आलं आहे. या सर्वांवर कडी म्हणजे, राज पुरोहित यांनी चक्क निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केलेत.

भाजपचे आमदार राज पुरोहित यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर टीका करणारी ही व्हिडिओ क्लीप प्रसिद्ध झाली आणि एकच खळबळ उडाली. यानंतर राज पुरोहित यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं. त्याची मुदतही संपली तरी, त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. आता त्यांची एक बनवेगिरी उघड झाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचीच फसवणूक केल्याचं माहीतीच्या अधिकारात उघड झालं आहे.

raj purohit
आमदार राज पुरोहित यांचे स्वत:चे, पत्नी राधीका आणि मुलगा सुरज यांचे प्रत्येकी दोन वेगवेगळ्या निवास्थानांचे मतदार ओळखपत्र असल्याचं समोर आलंय. तसंच निवडणूक शपथपत्रात पत्नी राधीका यांंच्या विषयी दिलेल्या माहीतीमध्ये, पॅनकार्ड नंबर दोन ठिकाणी 11 अंकी असल्याचं दाखवण्यात आलांय. जो नियमानुसार बोगस असल्याचं सिद्ध होतंय.

आयबीएन लोकमतने याबद्दल आमदार राज पुरोहित यांनाच विचारलं. तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले.

निवडणुकीत आयोगाच्या शपथपत्रात दिलेली माहीती खोटी ठरली, तर विजयी उमेदवाराचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. पण आमदार राज पुरोहित यांनी तर थेट निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे. त्यामुळे लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेलं निवडणूक आयोग काय निर्णय घेतायेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close