काँग्रेसचे 25 ‘गोंधळी’ खासदार 5 दिवसांसाठी निलंबित

August 3, 2015 5:51 PM0 commentsViews:

loksabha3444403 ऑगस्ट : ललितगेट आणि व्यापम घोटाळा प्रकरणावरुन काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला. अखेर आज या गदारोळाचं कारण पुढे करत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या 25 खासदारांना 5 दिवसांसाठी निलंबित केलंय. “प्रचंड गदारोळ” घातल्यामुळे निलंबन करत असल्याचं कारण महाजन यांनी दिलंय.

ललित मोदी प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांचा राजीनामा आणि व्यापम घोटाळ्यावरून लोकसभेमध्ये विरोधक आक्रमक होते. मंत्र्यांचा राजीनामा नाही, तोवर कामकाज नाही, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर लोकसभेत विरोधकांना डावललं जाऊ शकत नाही, असं म्हणत आम्ही चर्चेला तयार असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. पण, आमच्या कुठल्याही मंत्र्यांविरोधात पोलिसांत किंवा सीव्हीसीमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं सिंह यांनी म्हटलं. त्यावर आक्रमक होत सभागृह अध्यक्षांच्या समोर येत फलक झळकावले.

त्यावर सभागृह अध्यक्षा चिडल्या. विरोध करण्याची ही पद्धत नाही. विरोधकांच्या अशा वागण्याने आपण व्यथित झाल्याचं म्हणत त्यांनी 25 खासदारांना निलंबित केलं. “मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केले. मी सर्व पक्षांना सभागृहाची शान राखण्याची विनंती केली. मी जास्तीत जास्त हीच कारवाई करू शकते. मला हा निर्णय घ्यावा लागला. हा प्रत्येक खासदारासाठी वर्तवणूक नीट ठेवण्यासाठी इशारा आहे. ही कठोर कारवाई आहे हे मला मान्य आहे, पण माझ्यापुढे पर्यायच नव्हता” असा खुलासाही महाजन यांनी केला. तसंच या गदारोळामुळे मी खूप व्यथित झाले आहे. कोणीच काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कुठेतरी थांबायला लागेल, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिलीये.

लोकशाहीसाठी काळा दिवस -सोनिया गांधी

दरम्यान, निलंबनाच्या या कारवाईवर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येताहेत. हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली. संसदेलाही गुजरात मॉडेल राबवण्याचा प्रयत्न आहे. मुळात सभागृह एकतर्फी चालवण्याचा सरकारचा डाव असा आरोपच काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीविरोधी, हुकूमशाही प्रवृत्ती वाढतेय अशी टीका राजीव शुक्ला यांनी केली. ही कारवाई मुळात चुकीची आहे. आम्ही कोणतंही बॅनर सभागृहात धरलंच नव्हतं असा दावा काँग्रेसचे निलंबित खासदार निनाँग एरिंग यांनी केलाय.

ममतादीदी,’आप’चा काँग्रेसला पाठिंबा

तर दुसरीकडे, लोकसभा अध्यक्षांच्या या कठोर कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. आपले खासदार 5 दिवस लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close