ठाण्यात इमारत कोसळून 12 ठार

August 4, 2015 9:56 AM0 commentsViews:

मनोज देवकर, ठाणे

04 ऑगस्ट : ठाण्यातल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा रहिवाशांच्या जीवावर बेतलाय. नौपाडा इथं कृष्णा निवास ही इमारत आज पहाटे कोसळली. त्यामध्ये 12 जणांचा जीव गेला. विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक होती की नाही यावरून आता वाद सुरू झाला आहे. त्याची किंमत मात्र रहिवाशांना चुकवावी लागतेय.

सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता कृष्णा निवास ही 50 वर्षं जुनी इमारत कोसळली. दोनच तासांमध्ये एनडीआरएफचं पथक तिथं पोहोचलं आणि त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. या दुर्घटनेमध्ये 12 जण ठार झाले, तर 7 जण किरकोळ जखमी झाले. या दुदैर्वी दुर्घटनातील मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

इतकी मोठी दुर्घटना झाल्यामुळे रहिवाशांना मोठाच धक्का बसला असून ही इमारत पुनर्बांधणीच्या वादात अडकली असल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. तर ही इमारत धोकादायक होती की नव्हती यावर वाद सुरू झाला आहे. या दुर्घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाल्यामुळे स्थानिक नेतेही घटनास्थळी धावले.

thane bulding_collaps

ठाण्यातल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न जुनाच आहे. गेल्या आठवड्यात ठाण्याजवळच ठाकुर्ली इथं एक इमारत कोसळून 9 जण ठार झाले होते. त्यावेळी आणि त्याच्याही आधी अशाच मोठ्या चर्चा झाल्या. पण ठोस उपाय कधी होणार या प्रश्नाचं उत्तर तेव्हाही मिळालं नव्हतं आणि आताही मिळण्याची शक्यता धूसर आहे.

मृतांची नावं…

 • सुभराव भट (वय 54)
 • रामचंद्र पांडुरंग भट (65)
 • मीरा रामचंद्र भट (58)
 • रचिता भट (25)
 • रश्मी भट (25)
 • अरुण दत्तात्रय सावंत (62)
 • भक्ती सावंत (30)
 • अमित सावंत (40)
 • प्रिया अमृत पटेल (11)
 • अनन्या खोत (7)
 • मंदा अरविंद नेने (70)
 • महादेव बर्वे ( 65)

धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय. याच मुद्द्यावर आयबीएन-लोकमतचे काही प्रश्न आहेत.

 • जुन्या इमारतींबाबतचं ठोस धोरण का नाही?
 • झोपडपट्टी विकासाचं धोरण आहे, मग अशा इमारतींबाबत का नाही?
 • वोटबँकेच्या राजकारणात लोकांचा जीव जातोय का?
 • स्थानिक राजकारणी प्रशासनावर दबाव आणून कारवाई रोखतात का?
 • धोकादायक इमारतींकडे महापालिकांचं दुर्लक्ष होतंय का?
 • वारंवार घडणार्‍या या घटनांना जबाबदार कोण?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close