मध्यप्रदेशमध्ये एकाच ठिकाणी 2 ट्रेन घसरल्या, 30 जणांचा मृत्यू

August 5, 2015 10:19 AM0 commentsViews:

2 train dssaerailed

05 ऑगस्ट : मध्ये प्रदेशच्या हर्डा जिल्ह्यात झालेल्या दुहेरी रेल्वे अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाले आहेत. काल (मंगळवारी) रात्री साडे अकराच्या सुमाराला ही घटना घडली. मुंबईहून वाराणसीकडे जाणारी ‘कामायनी एक्स्प्रेस’, तर पाटण्याहून मुंबईकडे येणारी ‘जनता एक्सप्रेस’ या दोन्ही एक्स्प्रेसना मध्यप्रदेशच्या हरदापासून काही अंतरावर असलेल्या माचक नदीच्या पुलाजवळ अपघात झाला. आतापर्यंत 300 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मध्य प्रदेशातील हर्डा जिल्ह्यात कामायनी एक्स्प्रेस आणि जनता एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने दुथडी वाहणार्‍या माचक नदीवरील पूल पार करत असताना रुळाखालील माती सरकली होती. हे रूळ ओलांडतानाच कामायनी एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले आणि नदीत कोसळले. यात अनेक जण नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर या अपघातानंतर काही वेळातच पाटण्याहून मुंबईकडे येणार्‍या जनता एक्स्प्रेसला त्याच ठिकाणी अपघात झाला. जनता एक्स्प्रेसचे इंजिनसह 3 डबेही त्याच ठिकाणी रुळांवरून घसरून रुळाच्या बाजूलाच पडले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या विशेष गाड्या मदत आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत 300 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 30 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. बचावकार्यासाठी भोपाळहून एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या असून लष्करानेही 150 इंजिनअर्सची तुकडी मध्य प्रदेशला पाठवले आहेत. प्रवाशांना तातडीनं मदत देण्याचे सर्व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close