हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना शौर्य पुरस्कार – राजनाथ सिंह

August 6, 2015 2:18 PM0 commentsViews:

rajnathsigh

06 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये जेरबंद करण्यात आलेला दहशतवादी पाकिस्तानीच असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत दिली. दहशतवाद्याला पकडण्यासाठी मदत करणार्‍या स्थानिक ग्रामसथांसह हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना शौर्य पुरस्कार देण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

उधमपूर इथे बीएसएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत शून्य काळात निवेदन देऊन या घटनेबद्दल माहिती दिली. उधमपूर हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आलं. उधमपूरजवळी गावातील लोकांनी धोका पत्करून आणि प्राणांची बाजी लावून उस्मान या दहशतवाद्याला जिवंत पकडून पोलीसांच्या हवाली केलं. यामुळे या दोन्ही ग्रामस्थांचा साहस पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी सूचना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर सरकारला केली असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद नावेद उर्फ उस्मान असून, तो पाकिस्तानातील फैसलाबादचा रहिवाशी असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. या अतिरेक्यांकडून दोन एके 47, ग्रेनेड आणि दारगोळ जप्त केल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच, या अतिरेक्यांकडून सीमेपलिकडून होणार्‍या घुसखोरीविषयी निश्चित माहिती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close