रणरागिणींचा दणका, गावठी दारू पकडून दिली आणि नष्टही केली !

August 7, 2015 5:00 PM0 commentsViews:

jalgaon_gavathi daru07 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात महिलांनीच गावठी दारू पकडून दिल्याची धाडसी मोहिम फत्ते केली. भुसावळ तालुक्यातील शिरपूर कान्हाळा येथून रिक्षामधून ही दारू नेली जात होती. तेव्हा महिलांनी पाळत ठेऊन ही दारू पकडून दिलीय. गावातल्या दारूविक्रीकडे पोलीस सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी गावकर्‍यांदेखतच पोलिसांना हा दारूसाठा नष्ट करायला भाग पाडलं. जळगावच्या या रणरागिणीचं सगळीकडेच कौतुक होतंय.

यावल तालुक्यातील पाडाळसा या गावाच्या महिलांनी एका रिक्षात इंजन आणि सीटच्या मागे 4 कॅन भरून एकूण 70 लिटर गावठी दारू पकडून नष्ट केली आहे. अनेकदा रिक्षातून अशा प्रकारे गावठी दारू या गावात येत असल्याची माहिती गावकरी महिलांनी पोलिसांना दिली होती.

मात्र तरी देखील पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने अखेर आज महिलांनी स्वत: या रिक्षावर पळत ठेवून गावकर्‍यांच्या मदतीने ही रिक्षा पकडली. या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रिक्षा चालकास ताब्यात घेवून रिक्षासह दारूच्या कॅन जप्त केल्या.

पोलिसांवर विश्वास नसल्याने जप्त केलेली दारू आमच्या समोरच नष्ट करा अशी भूमिका महिलांनी घेतल्याने अखेर पोलिसांनी महिलांसमोर दारू नष्ट केली. विशेष म्हणजे लपवून गावठीदारू वाहतूक करणारी रिक्षाचा नंबर देखील मागे आणि पुढे वेगळा आहे. यामुळे या प्रकरणावर पोलीस नेमकी काय कारवाई करतात या कडे गावकर्‍यांचं लक्ष आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close