‘ती’ भेट झालीच नाही – संजय राऊत

August 9, 2015 7:53 PM0 commentsViews:

raj Uddhav

09 ऑगस्ट : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची बातमी आयबीएन लोकमत आणि काही वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. पण अशी भेट झाली नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या हवाल्याने केलाय.

उद्धव-राज भेटीची बातमी पसरवून काहीजण राजकीय गैरसमज निर्माण करत आहेत, मात्र अशा प्रकारची कोणतीही गुप्त बैठक झाली नाही, असं त्यांनी पत्रक काढून म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी कल्याण – डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेना – मनसे एकत्र लढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मात्र रविवारी शिवसेनेने पत्रक काढून हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

‘शिवसेना हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे, गुप्त खलबते करण्यावर आमचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरेंमध्ये कोणतीही भेट झालेली नाही’ असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. हल्ली काही जण अफवांच्या बातम्या बनवत आहेत, यामुळे पत्रकारितेचा दर्जा खालावत असल्याचं सांगत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवरच टीकास्त्र सोडले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close